मनोविश्व पाचोळ्याचे
झाडाला संवेदना असतात ना ? मग तशाच संवेदना पानांना देखील असतील ... मग गळून गेलेल्या पानांना हि असू शकतील .... सहसा आपण पाचोळ्यामधे साचलेल्या पानांच्या बाबतीत तितके संवेदनशील कधीच नसतो .... पण समजा त्यांना देखील स्वतःचे विचारविश्व असेल तर ते कसे असेल ? झाडापासून पहिल्यांदा निखळून हवे मध्ये अलगद तरंगताना येणारा पहिला विचार काय बरे असेल ? इतके दिवस असलेले झाडावरचे परावलंबन संपून झाडावर बसायला येणाऱ्या पक्षांप्रमाणेच जणू आपण उडत आहोत कि काय असे वाटत असणार .... हवेतून जमिनीवर टेकल्यावर मात्र स्वातंत्र्याच्या भ्रमाचा भोपळा फुटत असेल . हवेत उड्डाण घेण्यासाठी आपण किती असमर्थ हे लगेच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही . आणि हे लक्षात आल्यावर नैराश्याची भावना नक्कीच येत असेल . मग मात्र झाडापासून का दुरावलो , झाडाने कसे एका क्षणात परके केले यामागचे क्रौर्य हळू हळू उमगत असेल . ज्या झाडाच्या अंगावर आपण पावसात न्हालो , वादळ वाऱ्यांना तोंड देऊन उभे राहिलो...