पाचोळा
या जमिनीवर गरगरत पडणाऱ्या, लाल-पिवळ्या-केशरी रंगाच्या पानांकडे बघत, एक मजेशीर विचार माझ्या मनात येतो. ही झाडं इतकी माणसांच्या विपरित कशी ? अगदी basic फरक काय तर, ही झाडं कायम ज्याचा त्याग करतात जे त्यांनाच लागतं ! हे म्हणजे अगदीच माणूस जातीच्या विरुद्ध ! माणूस आपल्याला नको असेल ते सुद्धा जमवत राहातो. कशाचा त्याग करत असतील ही झाडं ? oxygen हो ! oxygen नाही का, झाडं घेतात, जगण्याकरता पाहिजे म्हणून. पण सोडून पण देतात दुसऱ्या करता ! आपण काय सोडतो ? Carbon Dioxide ? कोणाला काय उपयोग त्याचा ?!
आणि आता हिवाळा जवळ आलाय , तर हे सगळी झाडं, ब्लॅंकेट, स्वेटर वैगेरे घालून गुडूप व्हायचं ना ! तर उलट पानांच्या स्वरूपातले कपडे फेकून तोकड्या कपड्यांवर कुठे चालले हे सगळे ? हा काही उन्हाळा आहे का, रंगेबिरंगी कपडे घालून vacation ला बीच वर जायला ? एक मान्यं आहे, पूर्ण उन्हाळा भर दुसऱ्यांना सावली देण्याचं कर्तव्य करून, त्यांना पण थोडी विश्रांती पाहिजेच आता ! पण या दिवसात असं बिकिनीवर थंडी कशी नाही वाजत ? काही सांगता येत नाही यांना उलट गरम होत असेल.
आणि या रंगेबेरंगी सुंदऱ्यांमध्ये, ते शांत पुरुष कोण उभे आहेत ? जे अजूनही रंगाने आणि मनाने हिरवे आहेत ते ? गुपचूप या रंगेबिरंगी हसण्या खिदळण्याकडे चोरून बघत आहेत.
बघा नं, वारा सुटल्यावर झाडं झुकतात, आणि मनुष्य जात प्रत्येक गोष्टीला विरोध करत असते. मोडेन पण वाकणार नाही असं म्हणते. म्हणूनच झाडं आहेत तिथेच खंबीर पणे आपल्या करता असतात, आणि माणसं मनात आलं की बदलतात.
हा सप्तरंगी पाचोळा पायाने लाथाडत जात असताना, त्याच्या होणाऱ्या आवाजासारखेच, माझ्या मनात ह्या विचारांचा हा असंबंध आवाज.
सुdhir
Comments
Post a Comment