द्वंद्व !
मोठ्या हौसेने , कित्येक वर्षांपूर्वी , त्या चित्राभोवती घातलेली ती फ्रेम , अचानक - तुटलीच . कित्ती हळहळ वाटली तिला , काचा गोळा करताना तर अगदी वैताग - वैताग आला . त्या भिंतीवरची , ठरलेली ती जागा , आता भकास वाटू लागली .. एकदम भरूनच आलं तिला .. आपलंसं काही हरवल्यागत . जणू काही तिच्याच घराच्या चार भिंती , तुटल्या होत्या - अचानक . आणि उघडं पडलं होतं आता , वर्षानुवर्षं उरापोटी जपलेलं त्यातील एक गुपित ! चित्राकडे पाहिल्यावर , तिला दिसल्या सुरकुतलेल्या , काळपट आणि जीर्ण झालेल्या कडा . चुकलंच आपलं , तिला वाटलं .... वेळीच फ्रेम बदलायला हवी होती . चित्राच्या कागदाची अधून मधून अवस्था बघायलाच हवी होती . जुन्या - पुराण्या त्या फ्रेम मधे , कांटाळलं असेल नाही , हे चित्रं ? तीच भिंत , तीच जागा , तोच कोन आणि फ्रेम सुद्धा तीच . अजूनही दोन पर्याय आहेतच तिच्याकडे . नवी फ्रेम आणून ते चित्रं परत बंदिस्त करायचं , किंवा , उरलेले दिवस त्या चित्राला सगळ्याच चौकटीतून मुक्त करायचं ... ...