पाचोळा

पाचोळा

~अनिता म. कांत

 

तुझी आठवण, ऊरात भण भण,

    वारा घोंघावतो

आणि मनाच्या दारापाशी पाचोळा साचतो II

 

गंध मातीचा, भेट चोरटी

    कोसळणार्या सरी

छत्री असुनी भिजलो दोघे

    वेड लागल्यापरी

अजून दुपारी, टेकडीवरी, पाऊस रेंगाळतो

आणि मनाच्या दारापाशी पाचोळा साचतो II

 

वसंत येई, वसंत जाई

    हीच जगाची तर्हा

घटिकाभरचे मीलन खोटे

    विरह युगांचा खरा

तो क्षणभंगूर, भास मनोहर, का जीवन व्यापतो

आणि मनाच्या दारापाशी पाचोळा साचतो II

 

अलग जाहल्या ज्या वळणावर

    वाटा अपुल्या दूर

प्राजक्ताने जिथे झेलला

    या नयनांतील पूर

रोज सकाळी, झाडाखाली, सडा शुभ्र सांडतो

आणि मनाच्या दारापाशी पाचोळा साचतो II

 

बहर पाहता हृदयी खुपते

एकमेव शल्य

धवल फुलांचे, त्या पर्णांचे

होते निर्माल्य

प्रेमकहाणी, बने विराणी, नियम कधी मोडतो?

आणि मनाच्या दारापाशी पाचोळा साचतो II 

Comments

Popular posts from this blog

माझा बहुप्राणी प्राणी

पूर्णविराम

भिंत