ठहराव
ठहराव बारीकशीच होती जेंव्हा जन्माला आली जगेल असे वाटलंच नाही , जशी अवकृपा झाली दगडमाती, उन प्रखर , थंडी, काटेकुटे तिचा जीव घ्याया सारे कसे टपले होते सगऴं सगऴं दु:ख तिने एका घोटात गिळलं काय सांगू पट्ठीने अन चक्क बाळसं धरलं कुठून कसं बळ आलं, खळखळत राहिली समोर आलेल्या खडकांवर तिने झेप घेउन पाहिली जात राहिली पुढे घेऊन नशिबाचं देणं “मला नक्की जगायचंय” गुणगुणत हे गाणं झाली मोठी तडफदार आणि तरणी-ताठी, शोधली नाही कधी तिने आधाराची काठी किती बंध तिच्यावरी, वाट तिची कोंडे तिच्यासाठी भांडतात बडी बडी धेंडे सोसलेले तिने सारे गेले नाही व्यर्थ वेदनांच्या “जीवना”चे झाले जणू तीर्थ ज्यांच्यामुळे आले तिच्या डोळ्यांमध्ये रडू लागले ते महाभाग तिच्या पाया पडू पात्र तिचे रुंद आणि विशाल किनारे सामावून घेई सारी , नाले अन गटारे तिच्यामध्ये आला आता एक ठहराव माझे बिंब तिच्यामध्ये, नदी तिचे नाव. ~ अनिता म. कांत