द्वंद्व

 द्वंद्व

~अनिता म. कांत

(नवरा-बायको यांच्यातील वाद, फुटकळ किंवा गंभीर, हे अनादी काळापासून सुरु असलेले सनातन आणि आद्य द्वंद्व आहे.)

 

दमले वादळ, फुटला पेला, चहाचाच होता

कोण बरोबर, तू किंवा मी, खरा पेच होता

 

वाद रंगता विसरुनी गेलो काय असे मुद्दा

सखे आपुल्या द्वन्द्वामधला विषय हाच होता?

 

वार कराया शब्दांचीही गरज नसे आता

कटाक्ष साधा मौनामधला बोलकाच होता

 

पश्चिमेस मी, तू पूर्वेला, सदा तोंड अपुले

दिशाहीन, या संसाराचा नकाशाच होता

 

फसवे होते काय चांदणे अपुल्या प्रेमाचे

धडपडलो जो चंद्र धराया फाटकाच होता?

 

तुफान झेलून कितीक आपली नौका लागे पार

तारा, ज्याने दिशा दावली आपलाच होता

 

चुकला सारा हिशेब तरीही, जमा काही राही

भरतो माझे उणे, तुझा तो हातचाच होता

 

तंट्यावाचून घालवता दिन, वाटे चुकलेसे

बरा सावळा गोंधळ आपुला कालचाच होता

 

 

 


Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू