चरैवेति…चरैवेति… - बारा दिवस, बारा राज्ये आणि बारा मोटेची अमेरिका

चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुदुम्बरम् ।

सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरन् ॥


असं म्हणतात की चालत राहणाऱ्यालाच मध मिळतो, आणि चालत राहणाऱ्यालाच फळ देखील मिळते.

आणि म्हणून सूर्य देखील न थांबता चालतच राहतो.

त्यामुळे चरैवेति… चरैवेति… चालत राहा आणि चालतच रहा…



प्रवासाला निघताना आपण कुठे जाणार आहोत हे माहीत असतं; पण त्या प्रवासातून आपण काय घेऊन परत येणार आहोत, हे मात्र माहीत नसतं.

आमचा San Jose ते Peoria आणि तिथून जुन्या Route 66 चा माग काढत Santa Monica पर्यंतचा प्रवासही असाच होता.


बारा दिवसांत पाच हजारांहून अधिक miles आम्ही Tesla ने पार केले. नकाशावर पाहिलं तर अमेरिकेच्या बारा states मधून जाणारी एक लांबलचक रेघ. पण प्रत्यक्षात त्या रेघेवर आम्हाला अनेक वेगवेगळ्या America भेटल्या.



कुठे अफाट मोकळी जमीन, कुठे बर्फासारख्या पांढऱ्या salt flats, कुठे हिरवीगार शेतं, कुठे गजबजलेली शहरं, कुठे शंभर वर्षांपूर्वीच्या वैभवाच्या खुणा घेऊन उभी असलेली ओसाड गावं, कुठे शेकडो डबे घेऊन धावणाऱ्या मालगाड्या आणि कुठे क्षितिजापर्यंत पसरलेलं वाळवंट…


Sacramento मागे टाकल्यावर हळूहळू आपली ओळखीची California विरळ होऊ लागली. शहरं मागे पडली, traffic कमी झाला आणि Nevada च्या दिशेने जाताना रस्ता आणि आकाश या दोनच गोष्टी उरल्यासारख्या वाटू लागल्या. अशा वेळी destination पेक्षा पुढे जाण्याची इच्छा जास्त महत्त्वाची होते.


निदा फ़ाज़लींची प्रसिद्ध ओळ आठवते—


“सफ़र में धूप तो होगी, जो चल सको तो चलो.”


एखाद्या लांब road trip वर या ओळीला वेगळाच अर्थ मिळतो. पुढे काय आहे याची पूर्ण खात्री नसते. तरीही ओढल्यासारखे आपण पुढे जातच राहतो.


Winnemucca सोडल्यानंतर याच रस्त्याने आम्हाला एक कायमचा चटका लावणारी आठवण दिली. पहाटेची वेळ होती. Tesla अंधार कापत शांतपणे पुढे जात होती.


अचानक एक प्राणी रस्त्यावर आला. नक्की दिसला नाही, पण बहुतेक कोल्हा असावा. गाडीला आवाज नसल्यामुळे त्याला येणाऱ्या वाहनाची जाणीवच झाली नसेल कदाचित. Lights बघून ते बिचारं जनावर गोंधळलं असावं आणि अचानक आमच्या समोर आलं असावं. त्याचे भांबावलेले डोळे मला क्षणभर दिसले; पण काही समजण्याच्या आत धडक झाली.


Tesla चं थोडं नुकसान झालं; ते दुरुस्त करता येणार होतं. पण त्या जीवाचं जे झालं त्याचं फार वाईट वाटलं. नंतर बराच वेळ गाडीत कोणी काही बोललंच नाही. काही अनुभवांसाठी शब्दच नसतात. त्यांचे ठसे खोलवर उमटतात आणि मग व्याकूळ करत राहतात ते निःशब्द डोळे…


यत्नो मया कृतः सर्वः, नास्ति शक्तिरतः परम् ।

यद् भाव्यं तद् भविष्यत्येव, विधेः कोऽतिक्रमः क्षमः ॥


असो…


पुढे Utah चे Salt Flats आले आणि निसर्गाने जणू एका तासाभरात दृश्य बदलून टाकलं. डोळ्यांच्या टप्प्यापर्यंत पसरलेली पांढरी जमीन, त्यावर निळं आकाश आणि मध्ये आपली छोटीशी Tesla.


तिथे उभं राहिल्यावर बहिणाबाईंच्या कवितेतली जमीन आठवली—


“धरीत्रीची माया, अरे तिला नाही सीमा…”


त्यांच्या कवितेत माती सजीव होते. माणूस तिच्याशी बोलतो, तिच्यावर जगतो, तिच्यापासून शिकतो. महाराष्ट्राची काळी माती आणि Utah चं हे पांढरं, खारट मैदान यांच्यात खरंतर काही फारसं साम्य नाही. तरी दोन्हीकडे एकच गोष्ट जाणवते—माणूस कितीही मोठा झाला तरी जमिनीच्या भव्यतेसमोर तो अगदी नगण्य आहे.


Wyoming मध्ये प्रवेश केल्यावर अमेरिकेचा आकार वेगळ्या अर्थाने जाणवायला लागला. मैलोनमैल मोकळी जमीन, मध्ये एखादं ranch, दूर दूर ओसाड डोंगरांच्या अफाट रांगा, कुणावर तरी रागावलेला, सैरभैर झालेला भणाण वारा आणि समोर क्षितिजापर्यंत घरंगळत जाणारा रस्ता.


समस्त निर्मितीची माय असलेली पृथ्वी इथे अगदी त्रस्त आणि रुष्ट होऊन बसल्यासारखी वाटते.


Barren land. वांझ जमीन…


“मैं एक सदी से बैठी हूँ,

इस राह से कोई गुज़रा नहीं…”


म्हणणाऱ्या एखाद्या रुदालीसारखी…


अमेरिकेचं हे वाळवंट खूप काही शिकवून जातं. आपल्या दारात उगवणाऱ्या प्रत्येक वेलीचं, तिच्यावरच्या हरेक पानाचं आणि पायाखालच्या गवताच्या एकेका काडीचं आपल्यावर असलेलं ऋण सांगून जातं.


मध्ये Lovelock नावाच्या गावी एका जागी असंख्य लोकांनी आपली नाती छोट्या locks मध्ये बंद करून तिथे सोडली होती.


कितीतरी लोक काही मिनिटांसाठी तिथे थांबले असतील, आपली खूण ठेवली असेल आणि पुढे गेले असतील. त्या locks कडे पाहताना गुलज़ारांची एक छोटीशी ओळ आठवली—


“हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते,

वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते…”


कुणाची ती निघून गेली असेल, कुणाचा तो निघून गेला असेल. जाऊनदेखील आता अनेक वर्षं झाली असतील. कदाचित काही नाती कायमची बदलली असतील; पण त्या लोखंडी कुलूपांमध्ये त्यांचा एक क्षण अजूनही रस्त्याच्या कडेला अडकून राहिला आहे.


तो क्षण आता चिरंतन झाला आहे.


कदाचित म्हणूनच अशा ठिकाणी आपलेही पाय घोटाळतात. गेलेले क्षण आठवतात. आपल्यालाही एखादं कुलूप लावून ठेवावंसं वाटतं. डोळे भरून येतात आणि मग तेही राहूनच जातं.


Cheyenne मध्ये Union Pacific चं Big Boy steam locomotive पाहिलं. Photograph मध्ये त्याचा आकार समजतच नाही. प्रत्यक्ष त्याच्या समोर उभं राहिल्यावर ते locomotive कमी आणि लोखंडाची एखादी प्रचंड इमारत अधिक वाटते.


त्या Big Boy समोर आमची Tesla उभी असताना दोन युगं एकमेकांसमोर उभी असल्यासारखी वाटली.


एका काळात coal, steam आणि steel अमेरिकेला पुढे नेत होते; आज battery, software आणि electricity ते काम करत आहेत.


Technology बदलली, पण माणसाची दूर जाण्याची ओढ बदलली नाही.


मला तिथे कुसुमाग्रजांच्या “कोलंबसाचे गर्वगीत”मधली नव क्षितिजे शोधण्याची भावना आठवली—


“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा…”


त्या कवितेचा संदर्भ समुद्र ओलांडणाऱ्या धाडसाचा आहे; पण Big Boy पासून Tesla पर्यंतचा अमेरिकेचा प्रवास पाहताना तीच मानवी अस्वस्थता दिसते—क्षितिज दिसलं की त्याच्या पलीकडे काय आहे हे पाहिल्याशिवाय माणूस स्वस्थ बसत नाही.


या संपूर्ण प्रवासात American freight trains नी मला फार आकर्षित केलं. काही trains इतक्या लांब होत्या की आपण 70 miles per hour ने drive करत असतानाही त्या पाच-पाच मिनिटे संपता संपत नसत. Containers, tankers, grain cars—शेकडो डबे. कुठून आले, कुठे चालले, काय घेऊन जात आहेत, असे प्रश्न सतत पडायचे.


आपण highway वरून America पाहत होतो आणि बाजूच्या railroad tracks वरून जणू अमेरिकेची अर्थव्यवस्था वाहत होती. Farms, mines, factories, warehouses आणि ports यांना जोडणारं ते वेगळंच रक्ताभिसरण…


समोरून जाणाऱ्या त्या मालगाडीकडे पाहताना मला engine पेक्षा त्यामागची माणसं दिसत होती. कोणीतरी ते लाकडाचे ओंडके ओढून, कापून रूळ घालण्यासाठी sleepers तयार केले असतील. त्यावर लोखंडाचे अजस्त्र रूळ ठेवून ते पक्के बांधले असतील. एखादा पूल बांधताना कित्येकांचे हात शेवटचेच सुटले असतील. कोणीतरी धान्य पिकवलं, कोणीतरी container भरला, कोणीतरी locomotive maintain केलं, कोणीतरी रात्री-अपरात्री त्याला डबे जोडले आणि कोणीतरी उन्हातान्हातून ती train चालवत निघाला असेल.


आपल्याला फक्त चालणारी train दिसते; पण तिच्यामागचं मानवी जग दिसतच नाही.


Amazon वरून order दिली की जगात कुठेही तयार झालेली एखादी वस्तू काही दिवसांत आपल्या हातात पडते. आपण ती वापरतो, कधी आवडली नाही म्हणून परतही देतो. पण ती गोष्ट आपल्या हातात येण्यासाठी ही अजस्त्र यंत्रणा त्या रखरखीत वाळवंटात अहोरात्र राबत आहे, याची साधी जाणीवही आपल्याला नसते.


यालाच कदाचित कुणी “पुष्णी” म्हणत असावेत. कुणी God म्हणत असावेत. कुणी खुदा, तर कुणी invisible hand.


मला ते तुकोबांच्या वाळवंटात बेभान होऊन नाचणारे वैष्णवच वाटतात…


“खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे,

क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे…”


तर अशा त्या अजस्त्र विश्वकर्म्याचं दर्शन घेत, त्यातल्या हरेक वैष्णवाचे मनोमन आभार मानत, त्यांनीच सोप्या करून दिलेल्या वाटेने आम्ही एकेका mile ने पुढे जात होतो.


Nebraska मधलं Kearney त्यामुळेच अधिक अर्थपूर्ण वाटलं. Great Platte River Road Archway आणि museum मध्ये गेल्यावर आजचा आपला प्रवास किती सोपा झाला आहे याची जाणीव झाली. Tesla मध्ये climate control आहे, GPS आहे, पुढचा charger screen वर दिसतो, hotel काही seconds मध्ये शोधता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी बरंचसं driving स्वतः सांभाळते. तरीदेखील एखाद्या दिवशी चार-पाचशे miles झाले की आपण दमून जातो.


याच प्रदेशातून कधीकाळी pioneers आपला संसार wagon मध्ये घेऊन पश्चिमेकडे निघाले होते. पुढे रस्ता आहे की नाही, पाणी कुठे मिळेल, हवामान कसं असेल—कशाचीच पूर्ण खात्री नव्हती.


इथे Robert Frost च्या “The Road Not Taken” ची आठवण झाली. “Two roads diverged in a yellow wood…” या सुरुवातीच्या प्रतिमेपलीकडे त्या कवितेत निवडलेल्या मार्गाला आपण नंतर आपल्या आयुष्याचा अर्थ कसा देतो याची गंमत आहे.


Kearney मध्ये pioneers च्या वाटांकडे पाहताना जाणवलं—आपण आज ज्याला American West चा इतिहास म्हणतो, तो कधीकाळी हजारो सामान्य माणसांनी केलेल्या अशाच अनिश्चित निवडींचा परिणाम होता.


अनेक कुटुंबं चुकीच्या दिशेने गेली. कित्येकांचे आई-वडील वाटेतच निवर्तले. कित्येक लुटारूंच्या तावडीत सापडले. थंडीच्या कडाक्याने किंवा उष्म्याच्या प्रकोपाने कित्येक कोवळे जीव गेले. त्या सगळ्यांच्या चुकलेल्या वाटांमुळेच आज आपल्याला आपली वाट सापडली.


आपण त्या प्रत्येकाचे केवढे ऋणी असायला हवे…


थांबून कणभर माती हातात घ्यावीशी वाटली.


त्यांची प्रेतं इथेच कुठेतरी रस्त्याच्या बाजूला पुरली असतील. दोन अश्रू आणि एखादं रानफूल ठेवून त्यांना कायमचा निरोप दिलेला असेल. तो प्रत्येक अभागी जीव सीमेवर प्राण ठेवणाऱ्या सैनिकासारखा वाटतो. आणि आज दिसणारा रस्ता त्या वीरांचं स्मारक.


Roads are the war memorials of the trailblazers who marched to the horizons under the open sky and someday became one with it…


Omaha मध्ये Warren Buffett यांचं घर पाहायला गेलो. जगातल्या सर्वांत श्रीमंत माणसांपैकी एक आणि समोर तुलनेने साधं, आसपासच्या neighborhood मध्ये सहज मिसळून जाणारं घर.


त्यांच्या घरासमोर उभं राहिल्यावर संपत्तीची व्याख्याच बदलल्यासारखी वाटली.


गालिबची ओळ आठवली—


“हज़ारों ख़्वाहिशें ऐसी…

हर ख़्वाहिश पे दम निकले…”


माणसाच्या इच्छा कधीच संपत नाहीत. कुणीच त्याला अपवाद नाही. आणि मग आपण धावत राहतो छाती फुटेस्तोवर…


“बहुत निकले मेरे अरमान,

लेकिन फिर भी कम निकले…”


पण Buffett यांच्या घरासमोर उभं राहून प्रश्न पडला—सगळं मिळवण्याची क्षमता असूनही सगळं हवं असायलाच पाहिजे का?


कदाचित संपत्तीचा एक भाग ती अधिक मिळवण्यात आहे; पण दुसरा भाग किती पुरेसं आहे हे समजण्यातही असावा.


Peoria गाठल्यावर San Jose पासूनचा आमचा पहिला मोठा टप्पा पूर्ण झाला. दोन हजारांहून अधिक miles मागे पडले होते. आता थोडा आराम करायचा होता.


Peoria हे खरंतर आमचं मूळ गाव. मला विचारलं की तुम्ही कुठले कुलकर्णी? तर मी बेधडक सांगतो—


“मी पिओरियाकर कुलकर्णी.”


भारतात आल्यावर जे वाटतं, तेच Peoria मध्ये आल्यावर वाटतं. माहेरी आल्याचाच अनुभव असतो.


मनसोक्त दोन दिवस Peoria मध्ये फिरलो. सगळ्या रस्त्यांवरून परत परत जाऊन आलो. Archies आणि Renisa च्या शाळा, त्या जन्माला आल्या ते दवाखाने, आमच्या कामाच्या जागा बघून आलो. Illinois नदीच्या काठावर फिरून तिथला वारा शिडात परत भरून घेतला. Downtown मध्ये Caterpillar चे museum बघून आलो. देवळात जाऊन आलो. मित्र, ओळखीचे कितीतरी लोक भेटले.


आणि न विसरता Avanti’s आणि Jimmy John’s मध्ये मनसोक्त जेवूनही आलो.


ही काही पंचतारांकित restaurants नाहीत.


But we share so many memories with these places, they are more than seven-star places for us.


कित्येक वर्षांपूर्वी Peoria सोडल्यानंतर “घर एकले” लिहिताना मी लिहिलं होतं—


“घर एकले आसुसलेले, आठवणींच्या वाटेवरले…

या वाटेची रीत आगळी, उगम अंत मजसाठी जहाले,

पोटामागे बांधून सारे, सर्वही माझे वाहून नेले,

घर एकले आसुसलेले… आठवणींच्या वाटेवरले…”


तेव्हा त्या ओळी मागे राहिलेल्या घरासाठी लिहिल्या होत्या.


आज इतक्या वर्षांनी परत आल्यावर जाणवलं की घर म्हणजे चार भिंतींची वास्तू नसतेच. आपण जिथे पहिल्यांदा संसार उभा केला, मुलं जन्माला आली, नोकऱ्या केल्या, मित्र जोडले, धडपडलो, पडलो, पुन्हा उभे राहिलो—ते सगळं गावच हळूहळू आपलं घर झालेलं असतं.


“मेपल” लिहिताना जुन्या घराची जी ओढ मनात होती, ती बहुधा त्या घराच्या लाकडाची, विटांची किंवा अंगणाची नव्हती; त्या घरात राहून गेलेल्या आपल्या आयुष्याची होती. त्या घरात Archies ने लावलेल्या, जवळजवळ मरून गेलेल्या maple च्या काडीची होती.


त्या काडीचा आता अजस्त्र वृक्ष झालेला होता. ज्या घराने त्याला आपल्या अंगणात जागा करून दिली, त्या घराला सावली द्यायला तो maple आता सरसावला होता.


त्या दिवशी सकाळी War Memorial आणि Glen च्या चौकात खिशात दमडी नसलेले आणि बुडाखाली गाडी नसलेले, दोन miles चालत जाऊन हातातून दुधाचे दोन cans घेऊन परत चालत येणारे निखिल आणि अस्मिता आम्हाला पुन्हा भेटले.


इतकी वर्षं झाली तरी बिचारे तिथेच उभे होते.


त्यांची थोडी समजूत काढली आणि त्यांनाही आमच्या Tesla मध्ये घेऊन शुक्रवारी सकाळी Peoria चा निरोप घेतला.


निरोप हा प्रकार अवघडच असतो. व्यक्तीचा असेल, पाळीव प्राण्याचा असेल किंवा अगदी घरातल्या गणपतीचा देखील असेल—निरोप अवघडच.


मग गावात तर कितीतरी लोक असतात, कितीतरी आठवणी असतात. प्रत्येक जागेला, प्रत्येक रस्त्याला आपण कुठेतरी जोडलेले असतो.


बापरे.


अशा वेळी गाडी पुढे जात राहते आणि आपण मात्र मागेच राहतो.


क्षणाक्षणाने ते गाव निरोपाच्या धुक्यात दिसेनासं होत जातं. २०१३ मध्ये Peoria सोडताना देखील असंच दाट धुकं होतं आणि पाखरू पाखरू असलेलं मन असंच जड होऊन बसलं होतं.


“देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं,

कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं…”


But Dear Peoria, we love you.


And we look forward to being with you again, soon…


Peoria सोडून Bloomington मध्ये पोहोचलो आणि Route 66 च्या पहिल्या थांब्यावर थांबलो. आता इथून पुढे सुमारे अडीच हजार miles चा प्रवास करायचा होता.


घर मागे राहिलं होतं.


आणि समोर पुन्हा लांबच लांब रस्ता…


Route 66 म्हणजे अमेरिकेतला नुसता एक जुना रस्ता नाही. १९२६ साली Chicago पासून सुरू होऊन Illinois, Missouri, Kansas, Oklahoma, Texas, New Mexico, Arizona आणि California अशा आठ states मधून Santa Monica च्या Pacific किनाऱ्यापर्यंत जाणारा जवळपास २४०० miles चा हा रस्ता म्हणजे गेल्या शंभर वर्षांतल्या बदलत्या अमेरिकेचा एक मूक साक्षीदारच.


अमेरिकेच्या पश्चिमेकडे नशीब अजमावायला निघालेल्या कित्येक पिढ्या याच रस्त्याने गेल्या. त्यांच्याबरोबर रस्त्याच्या कडेला छोटी छोटी गावं उभी राहिली, motels आले, diners आले, gas stations आले, रात्रीच्या अंधारात दूरवरून खुणावणारे neon signs आले आणि नकळत एक संपूर्ण American road culture जन्माला आलं.


म्हणूनच कुणी त्याला “Main Street of America” म्हटलं, तर John Steinbeck ने “Mother Road”.


पुढे मोठमोठे Interstate Highways आले. वेग वाढला, प्रवासाचा वेळ कमी झाला आणि १९८५ मध्ये Route 66 अधिकृत U.S. Highway म्हणून इतिहासात जमा झाला. पण गंमत अशी की रस्ता सरकारी नकाशातून गेला तरी अमेरिकेच्या मनातून काही गेला नाही.


आजही त्याच्या जुन्या वाटेवरून जाताना कुठे एखादा मोडकळीस आलेला gas station दिसतो, कुठे पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा motel, कुठे एखादा जुना neon board अजूनही रात्री हट्टाने उजळत असतो, तर कुठे वाळवंटाच्या क्षितिजात सरळ घुसलेला रस्ता समोर पसरलेला असतो.


म्हणून Route 66 वरून फिरणं म्हणजे Chicago ते Santa Monica एवढं अंतर कापणं नव्हे; बदलत गेलेल्या अमेरिकेच्या जवळपास शंभर वर्षांच्या आठवणींतून, तिच्या छोट्या गावांतून, तिच्या स्वप्नांतून आणि त्या रस्त्यावर जगलेल्या असंख्य माणसांच्या पाऊलखुणांतून हळूहळू पुढे जात राहणं…


St. Louis मागे टाकून Rolla च्या दिशेने जाताना मात्र Route 66 ने आमची चांगलीच परीक्षा घेतली.


वाटेत एका छोट्याशा गावात charging साठी थांबलो. Chargers होते, पण Tesla ला चालणारे नव्हते आणि आमच्याकडे त्यासाठी लागणारा adapter नव्हता. आता दोनच पर्याय होते—तिथेच थांबायचं किंवा पुढचा Tesla charger असलेल्या Rolla पर्यंत जायचं.


Rolla साधारण ४५ miles दूर होतं आणि Tesla screen वर ५६ miles range दाखवत होती.


फक्त अकरा miles चा फरक.


गाव छोटंसं होतं. तिथे रात्र काढण्यापेक्षा पुढे जाणं आम्हाला योग्य वाटलं. शेवटी विचार केला, ५६ miles हातात आहेत, जायचं आहे ४५. सावकाश गेलो तर पोहोचू. आणि अगदीच battery संपली तर निदान Rolla च्या अधिक जवळ असू; roadside assistance बोलावता येईल.


निर्णय घेतला आणि निघालो.


पण त्या ४५ miles मध्ये रस्त्याने आमच्यासाठी काय राखून ठेवलं होतं, याची आम्हाला कल्पना नव्हती.


काही अंतर गेलो आणि आभाळ अचानक काळं झालं. पावसाला सुरुवात झाली आणि काही मिनिटांत त्याचं रूपांतर जबरदस्त thunderstorm मध्ये झालं. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि इतकी कमी visibility की highway वर गाडी चाळीस miles per hour च्या आसपास आणावी लागली.


त्यातच range अपेक्षेपेक्षा वेगाने कमी होऊ लागली.


आता गाडीतलं वातावरणही बदललं. AC बंद केला. Battery चा प्रत्येक mile वाचवायचा होता. पण AC बंद केल्यावर काचा fog होऊ लागल्या, त्यामुळे पाऊस असूनही अधूनमधून windows उघडाव्या लागत होत्या. समोरचा रस्ता नीट दिसत नव्हता, बाहेर विजा चमकत होत्या आणि screen वर Rolla पर्यंतचं अंतर आणि उरलेली range—दोन्ही आकडे खाली येत होते.


सुरुवातीचा अकरा miles चा margin हळूहळू विरघळत चालला होता.


त्यात कुणीतरी सांगितलं की याच भागात आदल्या दिवशी tornado आला होता. काही वेळाने दूर समोरच्या काळ्या आकाशात आम्हालाही tornado सारखी एक रचना दिसू लागली. ती खरोखर tornado होती की त्या वादळी ढगांचा भास, हे आम्हाला माहीत नव्हतं; पण त्या क्षणी ते शोधण्याची इच्छाही नव्हती.


काही वेळापूर्वी आपली एकमेव चिंता battery होती. आता battery संपून अशा वादळात highway वर अडकण्याची कल्पनाच जास्त भीतीदायक वाटू लागली.


मागे फिरूनही उपयोग नव्हता. मागच्या गावात आपल्या उपयोगाचा charger नव्हता. पुढे Rolla होतं.


त्यामुळे आता फार काही ठरवण्यासारखंही उरलं नव्हतं.


गाडी सावकाश पुढे नेत राहायची, शक्य तितकी energy वाचवायची आणि Rolla जवळ येत राहायचं.


आणि मग सुरू झालं ते विचित्र गणित.


Rolla — १८ miles. Range — २१ miles.


Rolla — १२ miles. Range — १४ miles.


आकड्यांमधला फरक कमी होत गेला आणि गाडीतलं बोलणंही.


आता कुणी फारसं काही बोलत नव्हतं.


फक्त screen, समोरचा पाऊस आणि पुढे सरकणारा रस्ता.


शेवटी Rolla चा charger दिसला आणि Tesla त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा screen वर जेमतेम एक mile range बाकी होती.


त्या एका mile कडे पाहताना जाणवलं की काही तासांपूर्वी screen वर दिसणारे ५६ miles आपण नकळत आपले समजून बसलो होतो. प्रत्यक्षात ते आपले कधीच नव्हते. तो फक्त त्या क्षणाचा अंदाज होता.


पुढे पाऊस किती पडणार, वारा कुठून येणार, चढ किती असणार, temperature कसं बदलणार—यापैकी काहीच त्या ५६ या आकड्यात कायमचं बंदिस्त नव्हतं.


त्या रात्री Rolla मध्ये गाडी charge केली आणि तिथेच थांबलो. पण त्या ४५ miles नी पुढच्या प्रवासासाठी एक साधा नियम कायमचा शिकवला—EV मध्ये पुढचा charger कुठे आहे हे माहीत असणं पुरेसं नाही. तो मिळाला नाही तर Plan B कुठे आहे हे माहीत असणं जास्त महत्त्वाचं.


आणि कदाचित रस्त्याची गंमतही हीच असावी. आपण निघताना आपल्या हातात route असतो, destination असतं आणि काही आकडे असतात. पुढे काय वाढून ठेवलंय, यावर मात्र आपला फारसा अधिकार नसतो.


Route 66 पुढे Kansas, Oklahoma, Texas, New Mexico आणि Arizona मधून सरकत राहिला. प्रत्येक state बरोबर त्याचा चेहरा बदलत गेला. कुठे जुना gas station, कुठे neon motel sign, कुठे अजूनही चालणारं diner, तर कुठे Main Street वर गवत वाढलेलं.


Kansas मधला Route 66 अवघा तेरा-चौदा miles चा; पण त्यातलं Galena हे छोटंसं गाव आमच्यासाठी फार मजेशीर stop ठरलं.


इथे जुन्या Kan-O-Tex gas station भोवती Cars movie मधली पात्रं जणू रस्त्यावर उतरून उभी आहेत—Mater, Lightning McQueen, Sheriff आणि इतर वेगवेगळ्या cars पाहताना आपण काही काळ Radiator Springs मध्येच आलो आहोत असं वाटतं.


तिथे भेटलेल्या एका अतिशय उत्साही lady ने आम्हाला त्या जागेची गोष्ट सांगितली. Pixar ची team Route 66 चा अभ्यास करत या परिसरात आली होती आणि इथल्या एका जुन्या, गंजलेल्या tow truck ने पुढे आपल्या लाडक्या Mater च्या character ला प्रेरणा दिली.


Cars मधलं Radiator Springs हे कोणत्याही एका गावाची copy नाही; Route 66 वरच्या अनेक गावांचा, माणसांचा आणि त्यांच्या गोष्टींचा तो मिलाफ आहे. पण Galena मध्ये उभं राहून त्या cars पाहताना आणि ही गोष्ट तिथल्याच माणसाकडून ऐकताना, पडद्यावर अनेकदा पाहिलेला Cars अचानक थोडासा खरा वाटू लागला.


पुढे Oklahoma च्या पश्चिम टोकाला Texola आणि Texas मधल्या McLean सारख्या Route 66 च्या काळात बहरलेल्या आणि आता जवळजवळ ओस पडलेल्या गावांतून जाताना मात्र दुसराच विचार आला.


मोडकळीस आलेल्या buildings, बंद दुकानं, जुने signs आणि समोरून जाणारा जवळजवळ रिकामा रस्ता.


McLean तर कधीकाळी Route 66 वरचं गजबजलेलं थांब्याचं गाव. Gas stations, restaurants, motels आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांवर चालणारे छोटे businesses यांनी ते जिवंत होतं. आजही तिथल्या जुन्या gas stations आणि बंद पडलेल्या व्यवसायांच्या खुणा त्या काळाची साक्ष देत उभ्या आहेत.


कधीकाळी इथे cars ची रांग लागत असेल, restaurants भरत असतील, motels मध्ये रात्री उशिरापर्यंत प्रवासी येत असतील.


मग Interstate 40 आला.


नव्या highway ने प्रवाशांना अधिक वेगाने पुढे नेलं; पण त्या वेगाबरोबर ही गावं मात्र मागे राहिली. Traffic निघून गेला. Businesses बंद झाले. माणसंही हळूहळू निघून गेली.


रस्ता फक्त काही miles दूर सरकला होता; पण त्या काही miles बरोबर एका गावाचं भविष्यही सरकलं होतं.


रस्ता बदलला आणि गावाचं नशीबही बदललं.


इथे मला बहादुर शाह ज़फ़रची निर्वासनात लिहिलेली प्रसिद्ध ओळ आठवली—


“लगता नहीं है दिल मेरा उजड़े दयार में…”


त्यामागचं दुःख आणि Texola-McLean चा इतिहास अर्थातच पूर्ण वेगळा आहे; तुलना करायचीही नाही. पण “उजड़ा दयार”—एकेकाळी जिवंत असलेली आणि आता ओस पडलेली जागा—ही प्रतिमा त्या Main Street वर उभं राहिल्यावर सहज मनात आली.


Buildings तिथे आहेत. रस्ता तिथे आहे. आकाश तसंच आहे.


फक्त त्या जागेला अर्थ देणारी माणसं निघून गेली आहेत.


Texas मध्ये Amarillo जवळ आलो आणि Route 66 वरचा आणखी एक भन्नाट landmark पाहायला थांबलो—Cadillac Ranch.


मोकळ्या Texas prairie च्या मधोमध दहा जुन्या Cadillac cars जमिनीत नाक खुपसून एका रांगेत उभ्या!


१९७४ मध्ये Ant Farm नावाच्या artists च्या group ने Stanley Marsh यांच्या मदतीने ही art installation उभी केली. बदलत गेलेल्या American automobile culture ला दिलेली ही एक वेगळीच सलामी.


पुढे इथे येणाऱ्या प्रवाशांनी या cars वर spray paint करायला सुरुवात केली आणि हळूहळू तेही या artwork चाच भाग बनलं. आज प्रत्येक नवीन प्रवासी त्यावर आपला रंग, नाव किंवा एखादी खूण सोडून जातो आणि काही वेळाने दुसरा कुणीतरी त्यावर पुन्हा काहीतरी रंगवतो.


त्यामुळे Cadillac Ranch कधीच पूर्ण होत नाही.


ते रोज बदलत राहतं.


Route 66 वर इतकी जुनी, बंद पडलेली आणि गंजलेली vehicles पाहिल्यानंतर इथे मात्र त्याच जुन्या cars ना जमिनीत पुरून त्यातून एक जिवंत, सतत बदलणारी कला निर्माण केलेली पाहण्यात एक वेगळीच मजा होती.


Texas मागे पडलं आणि Route 66 आम्हाला New Mexico मध्ये घेऊन आला.


Albuquerque मध्ये त्याची आणखी एक गंमत पाहायला मिळाली. Downtown मधल्या 4th Street आणि Central Avenue च्या intersection वर Route 66 चा रस्ता चक्क Route 66 लाच cross करतो.


मूळ 1926 चा Route 66 Albuquerque मधून north-south दिशेने 4th Street वरून जात होता. पुढे route बदलून तो east-west दिशेने Central Avenue वरून नेण्यात आला आणि त्यामुळे जुन्या आणि नव्या Route 66 चे दोन alignments इथे एकमेकांना छेदतात.


एखाद्या रस्त्याला स्वतःचाच भूतकाळ एखाद्या चौकात येऊन भेटावा तसं काहीसं.


एक Route 66 जुन्या दिशेने जात होता, दुसरा नव्या दिशेने; आणि आम्ही त्या दोन्हींच्या मधोमध उभे होतो.


Route 66 चा इतिहास वाचण्यापेक्षा तो असा प्रत्यक्ष रस्त्यावर आखलेला पाहण्यात वेगळीच मजा होती.


पुढे Gallup मध्ये El Rancho Hotel ला घेतलेला pit stop मात्र Route 66 वरच्या आमच्या आवडत्या stops पैकी एक ठरला.


बाहेरून पाहताना जुन्या Western movie मधून उचलून आणल्यासारखी इमारत आणि आत गेल्यावर मोठं wooden lobby, भव्य staircase, gallery, जुन्या photographs, movie memorabilia, museum, shop आणि अतिशय सुंदर restaurant.


सगळीकडे जुन्या काळाचा थाट जपलेला, पण कुठेही जुनाटपणा नाही—अतिशय प्रेमाने सांभाळलेली जागा.


आम्हाला तिथलं जेवणही प्रचंड आवडलं आणि तिथली माणसंही.


El Rancho हे केवळ restaurant किंवा Route 66 attraction नाही; ते आजही चालणारं hotel आहे. Hollywood च्या Golden Age मध्ये Western movies च्या shooting साठी Gallup परिसरात आलेले अनेक नामवंत कलाकार इथे मुक्काम करत असत आणि आजही त्या इतिहासाच्या खुणा तिथे जपून ठेवल्या आहेत.


काही ठिकाणी आपण इतिहास पाहायला थांबतो.


El Rancho मध्ये मात्र काही काळ त्या इतिहासातच राहून आल्यासारखं वाटलं.


New Mexico मागे टाकून Arizona मध्ये शिरल्यावर पुढे Seligman आलं.


Route 66 च्या इतिहासात या छोट्याशा गावाचं स्थान त्याच्या आकारापेक्षा खूप मोठं आहे. Interstate 40 आल्यावर इथलीही परिस्थिती इतर Route 66 towns सारखीच झाली होती. Traffic गेला, businesses कमी झाले आणि गाव हळूहळू मागे पडू लागलं.


पण Seligman ने आपला रस्ता इतक्या सहज मरू दिला नाही.


इथल्या लोकांनी जुन्या Route 66 ला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणि Historic Route 66 ला पुन्हा ओळख मिळवून देण्यात या गावाने मोठी भूमिका बजावली.


आज गावात शिरलं की जुनी cars, रंगीबेरंगी signs, diners, gift shops आणि Route 66 च्या खुणा सगळीकडे दिसतात.


आम्हाला तिथे एक विलक्षण माणूस भेटला. बराच वेळ त्याने आम्हाला Seligman ची आणि Route 66 ची गोष्ट सांगितली. एखाद्या museum मधून इतिहास ऐकण्यापेक्षा तो इतिहास जगलेल्या गावात उभं राहून, तिथल्याच माणसाकडून तो ऐकण्यात काहीतरी वेगळीच गंमत होती.


Texola आणि McLean मध्ये Route 66 मागे पडल्यावर काय झालं हे पाहिलं होतं; Seligman मध्ये मात्र त्याच रस्त्याच्या आठवणींना घट्ट धरून एखादं गाव पुन्हा कसं उभं राहू शकतं हे पाहायला मिळालं.


पुढे Kingman मध्ये Route 66 ने आणखी एक सुंदर भेट घडवली.


तिथे आम्हाला तीन cyclists भेटले—एक मराठी couple आणि त्यांचा मित्र. Los Angeles पासून Washington, D.C. पर्यंत सायकलवरून America पार करायला निघाले होते! साधारण ५३ दिवसांचा plan. रोज जवळजवळ ६० miles.


Arizona च्या उन्हापासून वाचण्यासाठी पहाटे तीन-चार वाजता cycling सुरू करायची आणि सकाळी दहाच्या आसपास त्या दिवसाचा टप्पा संपवायचा.


आम्ही Tesla मध्ये बसून हजारो miles पार करत होतो आणि हे तिघे मात्र आपल्या पायांच्या जोरावर अख्खा देश ओलांडायला निघाले होते.


त्यांच्याशी बोलताना मनापासून कौतुक वाटलं. त्यात ते मराठी निघाल्यावर तर त्या अनोळखी रस्त्यावर अचानक गावाकडचंच कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं.

रस्त्यांची खरी गोष्ट milestones मध्ये नसतेच; ती त्या रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांमध्ये असते.


Arizona मागे टाकून Colorado River ओलांडली आणि California मध्ये Needles ला आलो.


Route 66 च्या जुन्या प्रवाशांसाठी हा टप्पा म्हणजे California मध्ये प्रवेश करण्याचा आनंद आणि त्याच वेळी समोर उभ्या असलेल्या Mojave Desert ची चाहूल.


Needles मध्ये थोडा वेळ थांबलो. जेवलो. पण आता आमचीही मनःस्थिती बदलत चालली होती. Route 66 वर निवांत थांबत, गावं पाहत केलेला प्रवास आता शेवटाकडे येत होता.


आणि मग आला Needles ते Barstow चा Mojave Desert.


Missouri मध्ये पाणीच पाणी होतं; इथे पाण्याचा थेंबही दिसत नव्हता.


Needles मध्ये आमच्या Standard Range Tesla मध्ये साधारण 210 miles estimated range होती. Barstow जवळजवळ 153 miles दूर. कागदावर गणित सहज होतं.


पण Needles मागे पडल्यावर आणि Mojave चारही बाजूंनी पसरल्यावर तेच 57 miles चं cushion फार मोठं वाटेनासं झालं.


बाहेर प्रचंड उष्णता, air-conditioning सुरू, highway speed आणि मध्ये विश्वासाने अवलंबून राहता येईल असा charger नाही. प्रत्येक काही miles नंतर नजर battery कडे जायची.


त्या रखरखीत प्रदेशात मला मिर्झा गालिबचाच एक वेगळा शेर आठवतो—


“रौ में है रक़्श-ए-उम्र, कहाँ देखिए थमे…”


आयुष्याची सवारी चालू आहे; ती कुठे थांबेल कोण जाणे.


Mojave मध्ये मात्र आम्हाला ती Barstow च्या आधी थांबू नये एवढीच माफक अपेक्षा होती!


साहित्याची गंमत अशीच आहे. शंभर-दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या संदर्भात लिहिलेला शेर एखाद्या electric car च्या battery meter कडे पाहताना अचानक आपला वाटू लागतो.


त्या 153 miles नी EV range बद्दल जितकं शिकवलं तितकं कदाचित बाकी हजारो miles नी शिकवलं नाही.


“पोहोचण्याइतकी battery आहे” आणि “सुरक्षितपणे पोहोचण्याइतकी battery आहे” यात मोठा फरक असतो.


पुन्हा असा desert stretch केला तर range चं फक्त गणित करणार नाही; मोठा safety margin ठेवेन.


हजारो miles च्या या प्रवासात Tesla च्या self-driving capabilities चा भरपूर उपयोग केला. लांब highways वर त्याचा फायदा खरोखर जाणवला. Lane सांभाळणं, traffic प्रमाणे speed adjust करणं आणि दीर्घ driving मधला physical workload कमी करणं यामुळे चार-पाचशे miles चा दिवस सुसह्य होतो.


पण Winnemucca नंतरचा animal accident, Missouri चं weather आणि अनेक construction zones यांनी एक गोष्ट स्पष्ट केली—technology कितीही हुशार झाली तरी driver ने स्वतःला passenger समजण्याची वेळ अजून आलेली नाही.


Machine आपल्याला मदत करू शकते.


जबाबदारी मात्र आपलीच राहते.


आणि हळूहळू Los Angeles जवळ येऊ लागलं.


Mojave चा मोकळेपणा मागे पडला, traffic वाढलं, buildings वाढल्या, lanes वाढल्या आणि गेल्या कित्येक दिवसांपासून क्षितिजापर्यंत पसरलेला रस्ता पुन्हा शहराच्या गर्दीत मिसळू लागला.


आणि मग एका क्षणी समोर Pacific दिसला.


Santa Monica Pier.


इतके दिवस नकाशाच्या एका टोकाला दिसणारा तो बिंदू आता समोर होता. Route 66 चा symbolic western end.


गाडी थांबली. आम्ही Pier वर पोहोचलो.


आणि गंमत म्हणजे ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी इतके दिवस गाडी चालवत होतो, तिथे पोहोचल्यावर सांगण्यासारखं फारसं काही उरलं नव्हतं.


कारण खरी गोष्ट तर मागे राहिलेल्या पाच हजार miles मध्ये विखुरलेली होती.


Winnemucca नंतरच्या रस्त्यावरचे ते निःशब्द डोळे, Utah च्या Salt Flats वरची अथांग शुभ्रता, Wyoming चं मोकळं आकाश, Cheyenne चा Big Boy, आपल्या बाजूने मैलोनमैल धावणाऱ्या freight trains, Kearney मधल्या pioneers च्या पाऊलखुणा, Omaha मधलं Buffett यांचं साधंसं घर, Peoria मध्ये पुन्हा भेटलेले कित्येक वर्षांपूर्वीचे आपण, Missouri च्या वादळातून Rolla गाठताना उरलेला शेवटचा mile, Galena मधल्या Cars, Texola आणि McLean ची शांतता, Cadillac Ranch चे रंग, Albuquerque मध्ये स्वतःलाच cross करणारा Route 66, El Rancho चा जुना थाट, Seligman मध्ये भेटलेला त्याचा जिवंत इतिहास, Kingman मध्ये भेटलेले ते मराठी cyclists आणि शेवटी Needles ते Barstow दरम्यान पसरलेला Mojave…


किती रस्ते.


किती माणसं.


किती वेगवेगळी America.


Robert Louis Stevenson ने म्हटलं आहे—


“To travel hopefully is a better thing than to arrive.”


Santa Monica समोर उभं राहिल्यावर त्याचा अर्थ जरा जास्तच जवळचा वाटला.


आपण इतके दिवस Santa Monica कडे येत होतो; पण Santa Monica हे या प्रवासाचं खरं destination नव्हतंच. ते फक्त रस्त्याच्या शेवटी लावलेलं एक चिन्ह होतं.


Destination गाठल्याचा आनंद काही क्षणांचा; पण तिथपर्यंत पोहोचताना पाहिलेली जमीन, भेटलेली माणसं, ऐकलेल्या गोष्टी, आलेल्या अडचणी, केलेल्या चुका आणि नकळत आपल्याबरोबर पुढे आलेल्या आठवणी—तो खरा प्रवास.


San Jose मधून निघताना आम्ही एक cross-country drive करायला निघालो होतो. Peoria गाठायचं होतं. Route 66 करायचा होता. Santa Monica पर्यंत पोहोचायचं होतं.


पण परत येताना जाणवलं की destinations हा या प्रवासाचा फार छोटा भाग होता.


खरी America तर त्या destinations च्या मध्ये पसरलेली होती.


मोठ्या शहरांच्या बाहेरची America. Railway tracks वरून अहोरात्र धावणारी America. शेतांमध्ये राबणारी America. Wyoming च्या मोकळ्या आकाशाखाली पसरलेली America. Route 66 वर हळूहळू विस्मृतीत गेलेली America. त्याच Route 66 ला पुन्हा जिवंत करणारी America. आणि Mojave च्या रखरखीत विस्तारात माणसाला त्याचा लहानपणा दाखवणारी America.


कदाचित याच प्रवासातून मनात “Touring America” ची कल्पना आकार घेत गेली.


America शोधायची म्हणजे फक्त तिचे highways पालथे घालायचे नाहीत.


एखाद्या छोट्या गावात थांबायचं. तिथल्या माणसाशी बोलायचं. त्याची गोष्ट ऐकायची. जुन्या railway tracks कडे पाहायचं. एखाद्या ओस पडलेल्या Main Street वर दोन मिनिटं शांत उभं राहायचं.


आणि हे सगळं शोधता शोधता कदाचित थोडंसं स्वतःलाही शोधायचं.


समोर Pacific होता. मागे पाच हजारांहून अधिक miles होते. बारा दिवस होते. बारा states होत्या. असंख्य आठवणी होत्या.


रस्ता तर संपला होता.पण प्रवास? तो कधीच संपत नसतो.


तेव्हा चरैवेतिचरैवेति

Comments

Popular posts from this blog

पूर्णविराम

भिंत

माझा बहुप्राणी प्राणी