हेचि दान दे गा देवा ..
हेचि दान दे गा देवा
**
नो देवा नो. Not anymore. I really don’t want to do it.. ऐक ना …
गेले दोन दिवस नंदन कागदावर हेच लिहीत होता आणि देवकीला देत होता. त्याने देवकीच्या मागे हाच हट्ट लावला होता, आणि त्याच्या या नकारला “होकार” देण्याची देवकीची हिम्मत होत नव्हती. त्याच्या “नाही” ला तिचा “हो” म्हणजे पूर्ण घरादाराला अजूनच अंधाऱ्या दरीत लोटण्यासारखे होते. तिच्या उर्वरित आयुष्यात स्वतःच्याच डोक्यावर मणा-मणाचे ओझे वागवण्यासारखे होते. हा कदाचित खूप स्वार्थी विचार होतोय असेही तिला जाणवत होते, पण आता ती हार मानायला तयार नव्हती. ती हार नसून, परिस्थितीशी केलेली तडजोड नसून त्याची एक प्रामाणिक इच्छा आहे हे तिला सांगण्याचा नंदन आटोकाट प्रयत्न करत होता, आणि देवकीला कळत असूनही वळत नव्हते.
मेजर नंदन रेगे, द ब्लॅक कॅट कमांडो, गेले ४ वर्ष कर्करोगाशी झुंझत होता. ज्याने कळायला लागल्यापासून आपले आयुष्य देशासाठी वाहून टाकले होते, ज्याच्या मनात “मरण” या गोष्टीसाठी भीतीचा साधा लवलेशही नव्हता असा मेजर नंदन रेगे या असाध्य रोगाशी झुंजत होता. झुंजायचे ते समरांगणावर, देशासाठी, शत्रूशी दोन हात करताना. मरण आलेच तर ते वीरमरण यावे या तत्वावर आयुष्य जगलेला हा कमांडो आता झगडत होता स्वतःशीच, स्वतःच्या हतबलतेशी. हृदयाचा वाजणारा प्रत्येक ठोका जणूकाही त्याच्या मनावर घणाचे घावच घालत होता.
**
लग्न झाल्यापासून देवकीसाठी दोनच महत्वाच्या गोष्टी होत्या. नंदन आणि त्यांचा संसार. आर्मी च्या नोकरीमुळे दर ३-४ वर्षात नंदनची बदली नव्या ठिकाणी होत असे आणि त्यामुळे त्याचे आई-बाबा औरंगाबादला नंदन च्या मोठ्या भावाकडे रहात. देवकीचे बाबा पण एरफोर्स मध्ये असल्याने तिला या वातावरणाची चांगलीच सवय होती. त्यामुळे देवकी नंदन च्या मागे सावलीसारखी फिरत आपला संसार सांभाळत राहिली. रेवाचा जन्म झाल्यावर सगळ्यांचा आग्रह होता की निदान देवकी आणि रेवाने बाकीच्या कुटुंबाजवळ राहावे. पण जसे नंदनने देशासाठी व्रत घेतले होते तसेच देवकीने त्याच्याबरोबर सावलीसारखे असण्याचे. आणि त्यामुळेच दोघांची व्यक्तिमत्व जरी भिन्न होती तरी ती एकमेकांना पूरक ठरत होती.
**
जोधपूरला पोस्टिंग होते तेंव्हा नंदनचे. आर्मीच्या कडक शिस्तीच्या तालमीत तयार झालेला, कायम उत्साहाने भरलेला, इतरांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेला हसतमुख नंदन त्या दिवशी राऊंड घेत असताना अचानक चक्कर येऊन पडला. मग डॉक्टर, तपासण्या करता करता २ आठवड्यात निदान झाले “ब्रेन ट्युमर” आणि देवकीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या न्यूरोसर्जन्सच्या चेंबर मध्ये नंदनचा कॅन्सर बधीर मनाने ऐकताना दुःख, वेदना याबरोबरच आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा मिळालेला धडा पचवायला देवकीला अवघड जात होते. आर्म्ड फोर्सेस मध्ये काम करणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या आयुष्याची दोरी कधीही तुटू शकते यासाठी तिच्या मनाची कायमच तयारी होती. श्रीलंका, मणिपूर अशा ठिकाणी चालणारी त्याच्या ब्लॅक कॅट कमांडोजची मिशन्स कशी जीवावर बेतणारी असतात याची तिला चांगलीच कल्पना होती आणि अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी ती खंबीर होतीच, पण कॅन्सर? नंदन सारख्या शूर, वीर सोल्जरला कॅन्सरने मात द्यावी हि कल्पनाच तिला सहन होत नव्हती. नंदन तर आपल्याला असे काही होऊ शकते हे मानायलाच तयार नव्हता. दुसरे डॉक्टर्स, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन हे सगळे करूनही “उत्तर” एकच मिळायला लागले. नियती आपल्याला अशा मार्गावरून नेणार आहे याची नंदन आणि देवकीला त्या दिवसापर्यंत कल्पना नव्हती. आता नंदन एकदम “अलर्ट” झाला. त्याला समजले, शत्रू बाहेर नाही तर त्याच्याच शरीरात दबा धरून बसला आहे आणि त्या शत्रूला नेस्तनाबूत करायला त्याला सज्ज व्हायलाच हवे.
देवकी मात्र एकदम खचून गेली. आतून तिला कळत होते की ही खचण्याची वेळ नाही तर खंबींर होऊन परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आहे. नंदन ला सांभाळण्याची वेळ आहे. आत्ता कुठे रेवा हायस्कुलला गेली आहे. तिला जपायला हवे. पण..पण तिचा कमांडो जो कायम तिचा आणि पूर्ण कुटुंबाचा एक स्ट्रॉंग फोर्स होता त्याला अशा असाध्य रोगाने पकडल्याचे कळल्यावर आधी तर तिचा विश्वासच बसेना आणि मग जेंव्हा सगळेच रिपोर्ट्स त्याची ग्वाही द्यायला लागले तेंव्हा ती अक्षरशः कोलमडली.
नंदन मात्र एव्हाना त्याच्या स्वभावाप्रमाणे फोर्थ स्टेज कॅन्सर कडे एका “प्रोजेक्ट” सारखे बघू लागला होता. इंटरनेट वरून बरीचशी माहिती गोळा करून, डॉक्टरांशी कन्सल्ट करून आपल्या ट्रीटमेंट ची आखणी करू लागला होता. अजूनही तोच मार्ग काढत होता आणि देवकी सावलीसारखी त्याच्यामागे जमेल तसे, स्वतःला सावरत जात होती. एकीकडे मनात तिला कमालीचे गिल्टी वाटत होते. नकारात्मक विचार बाजूला सारून, नंदनच्या बरोबरीने तिला या अग्निदिव्याला सामोरे जायलाच हवे होते.. पण मनाची तयारी होत नव्हती. दोघांच्या आई-बाबांना याची कल्पना देण्याचे कामही नंदननेच केले. त्याच्या आवाजातील आत्मविश्वास जरी त्यांच्या मनाला दिलासा देऊ पाहत होता तरी बातमीने सगळे कुटुंबच हबकून गेले होते.
सर्जरी झाली. ट्युमरचा मोठ्ठा भाग काढला गेला. सर्जरी नंतर ICU मधल्या अनेक मॉनिटर्स आणि नळ्या लावलेल्या अवस्थेत देवकीने तिच्या कमांडोला पहिले. त्या मॉनिटर्स मधून येणारे वेगवेगळे आवाज त्या क्षणी तिला फार भीतीदायक वाटले. बेशुद्धावस्थेत असलेल्या नंदन चा हात हातात घेऊन ती बसली आणि तिला जाणवले की ते आता अशा वळणावर आहेत की जिथून “माघार” हा पर्यायच नाहीये. आता केवळ पुढेच जात राहणे. या पुढच्या लढ़ाईची सूत्र आता देवकीलाच हातात घ्यावी लागणार होती. तिच्या संसाराचा कमांडो आता तीच असणार होती. आणि मग पुढच्या टेस्ट्स, स्कॅन्स, किमोथेरपी-रेडिओथेरपी यावर चर्चा, माहिती हे सत्र सुरु झाले. ट्रीटमेंट विषयी मिळणारी प्रत्येक माहिती, त्यांचे साईड इफेक्ट्स हे ऐकून तिच्या पोटात गोळा येत होता, पण ती स्वतःला बजावत होती, “देवकी, Snap yourself Out of Its Deathly Jaws, Now!” …
**
“Glioblastoma (ग्लिओब्लास्टोमा brain tumor) has no prognosis. He has maximum 4 to 6 months” - असं पहिल्या सर्जरी नंतर न्यूरोसर्जनने सांगितले होते. पण पूर्ण प्रयत्नानीशी शत्रूशी लढल्याविना हार मानणारे देवकी आणि नंदन दोघेही नव्हते. आणि ते लढले. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती म्हणा किंवा नंदनचे आर्मीच्या ट्रेनिंगने तयार झालेले शरीर त्या रोगाला पुरून उरले म्हणा किंवा अगदी एक चमत्कार म्हणा.. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर एक दिवस डॉक्टरांनी “नंदनला आता किमोची गरज नाही” हि आनंदाची बातमी दिली. He had conquered it. नंदन “कॅन्सर सर्व्हाइवर” झाला होता. कुटुंब, आर्मी कलिग्ज, मित्र-मंडळी सगळ्यांनाच आनंद झाला. देवकी आणि रेवाला तर जणू आकाश ठेंगणे झाले होते. ते सगळे आता कॅन्सरच्या विळख्यातून “मुक्त” झाले होते.
**
एक वर्ष चांगले गेले, पण एक दिवस देवकी आणि नंदन दोघांना जाणवले कि बोलताना नंदन चा आवाज घोगरा येतोय. थंडी, हवाबदल अशा कारणांचा विचार करत १ आठवडा गेला, पण त्याचा आवाज बिघडतच गेला. मग परत डॉक्टर्स, टेस्ट्स मागून टेस्ट्स MRI, CT scan, endoscopy..पण काहीच निदान झाले नाही आणि निदानाशिवाय उपाय शक्यच नव्हता. डॉक्टरांनी शेवटी PET SCAN करून घेण्याविषयी सल्ला दिला आणि रिपोर्ट्स आले तेंव्हा समजले की नंदन च्या स्वरयंत्रावर कॅन्सर परत स्वार झाला होता. नंदनचे स्वरयंत्र काढून टाकावे लागणार होते. दुसऱ्याच दिवशी डॉक्टर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल व्हायला सांगत होते. आता देवकीला आपले अश्रू रोखणे शक्य नव्हते आणि तिचे अवसान गळून पडले होते. स्वतःला नंदनच्या मिठीत झोकून देत ती हमसून हमसून रडत होती आणि नंदन तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करत होता. “ That’s OK Deva. जान है तो जहाँ है. असही लग्नानंतर तू मला किती बोलू देतेस? We will fight it again. A soldier never quits, nor does his wife” आणि यावेळी सुद्धा घरा-दाराला सोबत घेऊन दोघेही लढले.
**
काही महिने जरा बरे गेले आणि एक दिवस परत नंदन चक्कर येऊन पडला. त्याला देवकीने लगेच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सगळ्या टेस्ट्स झाल्या आणि निदान झाले.. कॅन्सर आता परत मेंदूत आणि पूर्ण मणक्यांवर पसरला होता. यावेळी डॉक्टर एकट्या देवकीशीच बोलत होते कारण नंदन खूपच अशक्त झाला होता. नंदनचे शरीर आता पुढची ट्रीटमेंट सहन करू शकेल याची त्यांना शाश्वती वाटत नव्हती. त्याचे उरलेले दिवस त्याला घरच्या शांत वातावरणात घालू देणेच त्यांना योग्य वाटत होते. शिवाय खर्च पण खूप होता. पण देवकी आता पेटून उठली होती. आयुष्य परत परत घेत असलेल्या परीक्षेला तोंड द्यायचेच हे तिने ठरवले होते. नंदनचे A soldier never quits, nor does his wife हे तिला पदोपदी आठवत होते आणि नंदनच्या डोळ्यात “आपण हारलोय” हे पाहणे तिला मान्य नव्हते.
नंदनला मात्र आता देवकीची आणि अख्ख्या घरादाराची ओढाताण बघवत नव्हती. हा रोग असाध्य आहे आणि आपण त्याच्याशी शक्य तेवढी फाईट दिली, हे तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. Cancer might have invade my body, but I have not allowed it to invade my spirit - हे तिला सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. पुढच्या ट्रीटमेंटला तो स्वेच्छेने “नकार” देऊ पाहत होता, कुटुंबाचा मिळणारा सहवास आणि थोडी मनःशांती हेच त्याच्या दृष्टीने आता महत्वाचे होते. पण देवकीने त्याच्याबरोबर गेली साडेतीन-चार वर्ष जी झुंज दिली होती ती पाहता त्याच्या नकाराला तिची “संमती” मिळविणे त्याला अपरिहार्य वाटत होते. तिच्या साथीशिवाय हा उरलेला प्रवास त्याला शक्य नव्हता आणि त्यासाठीच गेले दोन दिवस तो तिला हे समजवायचा प्रयत्न करत होता. नंदनची आई आणि भाऊ सुद्धा देवकीला आता तेच सांगत होते.
**
नंदनच्या नकाराला आपला होकार म्हणजे पुढच्या सगळ्याच शक्यतांना दार बंद करणे हे देवकीला माहीत होते. ज्याच्याबरोबर आपण आपला संसार उभा केला, ज्याच्या शौर्यगाथा ऐकत आपला संसार फुलाला, ज्याच्या साथीने भविष्याची स्वप्ने पहिली, त्याचा सहभाग आता त्या संसारात नसेल, त्याचा हात आपल्या हातात नसेल, त्याचे छत्र आपल्या रेवाच्या डोक्यावर नसेल - हे पण देवकीला माहीत होते. नंदनला या हॉस्पिटल मधून घरी घेऊन जाणे म्हणजे तिने त्याची शेवटची इच्छा मानण्यासारखे होते.
“शेवटची” या शब्दावर ती अडखळली..नव्हे थांबली. आजपर्यंत नंदनची प्रत्येक इच्छा तिने अक्षरशः झेलली होती. त्याच्या आनंदातच तिला तिचा आनंद गवसला होता. मग आज ती त्याच्या इच्छेचा मान ठेवायला का कचरत होती?
विचार करतच ती नंदन च्या रूम मध्ये शिरली. अनेक मॉनिटर्स आणि नळ्यांच्या जाळ्यात जखडलेला, घशातून घर्रर्रर्र घर्रर्रर्र आवाज येणारा नंदन त्या हॉस्पिटल बेड वर पडलेला तिला दिसला आणि तिचे डोळे परत भरून आले. तेवढ्यात रूम मधल्या नर्सने हळूच तिच्या हातात एक कागद ठेवत नंदनकडे बोट दाखवले. नंदनने कागदावर परत काहीतरी लिहिले होते -
My Dearest Deva,
Allow me to feel the warmth of your heart,
Let me soak in the love before we go apart !
I wish to lie down next to you in the bed,
Want to say the things I never said !
Take me home, to the home we built
Grant me this wish, pushing out every guilt !
एव्हाना देवकीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे तो कागद भिजला होता.
त्याचा नकार तिच्या होकारात रुजला होता.
**
समाप्तं
Comments
Post a Comment