सहवासी हो

 


सहवासी हो

~ निखिल कुलकर्णी 

मंतरलेल्या प्रत्येक सकाळी, नव्या लाटा घेवून जुनेच प्रश्न परत परत विचारत का बसलेला असतोस?
 
त्याच मुक्या आकाशाला, कधीतरी बोलेल आकाश तुझ्याशी, तुझ्या अस्तित्वाविषयी, असे वाटून?
 
खरेतर प्रत्येकाचेच अस्तित्व स्वत:ला निर्गुण करुणे मधे शोधत बसलेले असते अहोरात्र
वाळूच्या त्या एकेकट्या कणांसारखे..  
 
अथांग अपरंपार निष्ठेने...
 
एवढी साधी गोष्ट तुला कळू नये?
 
एकेक थेंब मिळून झालेला अजस्त्र थेंब, ही तुझ्या कुरूप अस्तित्वाची ओळख तुला पुरेशी नाही का?
आणि काय करायचे आहे तुला तुझ्या जन्माचे गुह्य ऐकून?
 
अरे त्या निराकार आकाशा सारखा तुझा जन्म देखिल अपरंपार असहायतेतूनच झाला असेल कदाचित.
 
तुझ्या जन्मासाठी कुणीही कसलाही यज्ञ केला नसेल किंवा तुझ्या जन्माचा कुणी कुठेही उत्सव देखिल साजरा केलेला नसेल.
 
कदाचित, कदाचित पृथेचा लाडका चंद्र, जेव्हा रागाच्या भरात तिला सोडून कायमचा निघून गेला असेल,

 त्या दिवशी अशाच ब्राम्हमुहूर्तावर, सूर्याची चाहूल लागण्यापूर्वी ताऱ्यांच्या संगतीत रमलेल्या आपल्या लाडक्या कोरीतल्या चंद्राकडे पहातती रडली असेल,

 
एकटीच, काळ्या कुट्ट अंधारात, गोठ्यातल्या वासरू हरवलेल्या गाई सारखी..
 

आणि भरली असेल तिची रिती ओटी तिच्याच अथांग अश्रुंनी..

 
या अपार दु:खाची आठवण म्हणून वागवत असेल ती तुला, तिच्या अंगाखांद्यावर अपार करुणेने...  


त्याची थोडी तरी आठवण ठेव कृतघ्ना आणि थांबव ते भयंकर निष्ठूर आसूड...
 
सहवासी हो, प्रगल्भ हो, प्रशांत हो..आकाशासारखा..
 


Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर