धुके

 




 धुके

 

कुठे चालली धुक्यापलीकडे

तुझी नी माझी चार पावले

गवसतील का तिथे आपुल्या

जगण्यामधले रंग उसवले

 

पुन्हा भेटलो, पुन्हा हरवलो

काळाच्या सरकत्या पटावर

कधी बुडालो भोवर्यात अन

कधी नदीच्या दोन तटांवर

 

“बसू या थोडे, ऐक सांगते”

आयुष्याच्या या वळणाशी

सुख दु:खाचा हिशेब थोडा

जमले जे जे अपुल्यापाशी

 

कधी परतलो जर या जागी

ओळख अपुली कशी पटावी?

गूज आपुल्या दोघांमधले:

रिमझिम पाऊस, चंद्रमाधवी

 

तुझे हसू अन माझा गहिवर

पुरुनी ठेऊ इथे खोलवर

एक चूक अन एक भूक ही

दगड खुणेचा आणिक त्यावर

 

रुजतील तीही, होतील स्वप्ने

पसरतील ती पुन्हा नव्याने

कुणा दुजाच्या मनी होऊनी

तुझे नी माझे शुभ्र चांदणे


अनिता म.कांत.

------------XX-------------

 

 

Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर