क्षणभंगुर
छायाचित्र: सोनाली हर्डीकर
क्षणभंगुर
~अनिता म. कांत
जे जे जगती सुंदर त्याची क्षणभंगुर काया
दैव म्हणा, प्रारब्ध म्हणा ही अजब असे माया IIधृII
कोषामध्ये विणली स्वप्ने फुलपाखराने
फडफड करुनी पंख आपुले उडते मोदाने
अजाण परी ते! हात पाठुनी येई पकडाया II१II
नितळ तटाकी जळात पोहे मासा सोनेरी
क्षणात इकडे क्षणात तिकडे उत्साही भारी
गळास टाकूनी बसे तीरावर कोळी फसवाया II२II
कळी गुलाबी फुले निरागस सोनुली वनात
प्रसन्न दरवळ, गंधीत होई पुरा आसमंत
देवपूजेस्तव कुणी भक्तजन जाती खुडावया II३II
तृणपात्यावर थेंब दवाचा विराजे सकाळी
रविकिरणांनी हिर्यापरी त्यां येतसे झळाळी
मिळे मातीला, वारा जेंव्हा लागे वहावया II४II
Comments
Post a Comment