रस्ता
जवळ जवळ एका वर्षापूर्वी, शहरं लॉकडाऊन झाली तेव्हा अनेक रोजंदारीने काम करणारे कष्टकरी बेकार, बेघर झाले. वाहतुकीची साधनंही बंद होती, त्यामुळे लोकांचे जथ्थे चंबू गवाळं बांधून आपापल्या गावी चालतच निघाले. हे चित्र पाहून त्या मास-मायग्रेशन ची आठवण झाली. त्या पार्श्वभूमीवर ही कविता:
रस्ता
झालं वरीस गं सये, येती सय म्हमईची
न्हाई सगे, न्हाई जागा, परी सोय खळगीची
गळे घाम टपटपा, काम देनारी म्हमई
तिनं भूकेजल्या पोटी कधी निजविलं न्हाई
शिनेमाची ष्टोरी जनू अशी आली मं आफत
रोग फैलावला टाळं घरी-बाजारी ठोकत
घरी गुमान बसती ज्यांची भरल्याली पोटं
ज्याचं बिऱ्हाड पाठीवं त्यानं जावं तरी कुठं
हात बोचकं बांधती, परी मन आडमुठं
तरी गावी पोचनारी वाट पावलांना फुटं
यष्टी गाडी काई न्हाई, ठेच पावलोपावली
पाया बसती चटके, कुठं दिसंना सावली
मैलोमैल तुडवले, लेकरंही खाती खस्ता
गावी पोचलो तरीही, संपलाच न्हाई रस्ता
मन धजावेना जरी, जखमांची भिती खातं
आता खपली धरली, पायां परतावं वाटं
पोटातल्या खड्ड्यापुढं वाट बारकी दिसते
आन् म्हमईला कमी माझ्या घामाची भासते
मधुराणी
३/४/२१
चित्र: आदित्य आजगांवकर
चित्र संपादन: समृद्धी घैसास
Comments
Post a Comment