को SS हं ?
मी दिसतो, तसाच असतो हे असेच, बहुदा नसते
बिंबाच्या प्रतिबिंबाशी, असण्याचे अंतर फसते !
मी वावरतो कोणी एक, कुणी एक मन हे म्हणते
द्वंद्वाला कुरवळणारी ती चौकट अडून बसते!
मी हसतो तेंव्हा हसलो कधी असेच ते ही नसते
ओठांची महिरप वेडी डोळ्यांतून स्फुंदत असते!
मी जगतो म्हणतो तेंव्हा वहिवाट ती केवळ असते
मज हवी हवीशी दुनिया, स्वप्नाच्या गावी वसते !
मी रडतो दुसऱ्यासाठी, पण दु:ख स्वत:चे असते
तो ज्याचा गेला त्याच्या - हे गावी सुद्धा नसते !
मी कधी कलंदर असतो, कधी नियती भणंग असते
या तळ्या-मळ्याच्या काठी, मम वृत्ती मलंग असते..
प्रीती
५ मार्च २०२१
छायाचित्र संपादन: समृद्धी घैसास
Comments
Post a Comment