मी माझा
मी माझा
हे जुनेच दालन आणिक त्यातील जुन्याच रेखाकृती
मज समीप परी ही केवळ धूसर माझीच असे प्रतिकृती
एक दिवा तो मिणमिणतो, दर्शवाया रितेरिते पण
जावो सोडून एक एक ते, मजला प्यारे माझे मीपण
चितारलेल्या चित्रांमधले, गेले उडुनी रंग ही सारे
भकास त्या चौकटीनमधले, लयास गेले सगळे चेहरे
सुंदरतेचे ढलपे पडूनी, उदास जुनकट झाल्या भिंती
परी देती निवारा, निग्रही विचारा, अन् साथीला माझी विरक्ती
नाही प्रियतम, नाही आत्मज, स्वार्थी सारे ढोंगी पामर
म्हणूदे मजला निरस, दुराग्रही, स्व मूर्तीचे जपतो मंदिर
जगास साऱ्या फक्त हवा हो, झगझगाट तो ऐश्वर्याचा
अनासक्त मी नकोच मजला, मार्ग क्षणिक तो भौतिक सुखाचा
या पार्थाच्या आयुष्य रथाला, कृष्ण सारथी नाही लाभला
मीच माझी रचुनी गीता, सग्यां सोबत संग्राम मांडला
कठोरतेने शस्त्र चालवून, निकट जिवलग जरी गमविले
हेकटतेने वार करूनी, मनोराज्य जिंकून घेतले
मी करारी, मीच विचारी, बुद्धिमान मी आहेच किती
प्रतिबिंब माझे सवे माझिया, एकाकीपणाची कशास भिती?
मज समोर याचक घेऊन येती, उसने खोटे प्रेम जिव्हाळे
स्थितप्रज्ञ मी, हृदयी माझ्या, न फुटती असले तुच्छ उमाळे
प्रकाशझोत तो आनंद- सुखाचा, अजूनही ठोठावतसे दार
निर्विकार मी, बंद कवाडे, पोहोचलो साऱ्या क्षितिजाच्या पार
सौ. सविता हर्षे
Comments
Post a Comment