जखम
चित्र : आदित्य आजगांवकर / संपादन: समृद्धी घैसास
जखम कुण्या पायाची, का मनास सलते आहे ?
खपलीच्या कवचा खाली, वेदनाच जळते आहे !
ओकते रक्त ती जेंव्हा, सांगते एक कहाणी
रक्ताविण कुरतडणारी, गाथा भळभळते आहे !
पाऊले घालत जाती, रांगोळी येथे लाल
जणु उजाडलेले भाळ, मळवट भरते आहे !
वाहूदे वाहील जोवर, ते ज्याचे त्याचे प्राक्तन
कोरडेच असतील डोळे, जरी 'प्रीत' विव्हळते आहे !
ओझे हे आयुष्याचे, नेणारच आयुष्याला
ते गेल्या वरती बोलू, जे हाती उरते आहे !
जी वाट भरे काट्यांनी, तो प्रवास खडतर आहे
आशेची फुंकर ओली, पण पुढे ढकलते आहे !
आशेची फुंकर ओली, पुढे ढकलते आहे !!
~प्रीती देशपांडे
४ मार्च, २०२१
Comments
Post a Comment