ऊब

 ऊब


ओल्या मातीच्या उबेत, जसे बीज अंकुरते

तसे मातेच्या उदरी,   गर्भ आकाराला येते


उबदार घरट्यात,   पक्षिणीच्या पंखाखाली

पिल्लू वाढते निवांत,    जिवापाड ती जपते


आजीच्या गं गोधडीत, ऊब मायेची मिळते

मऊ हात थोपटती,    भ्रांत विरूनिया जाते


मऊशार दुलईत,          प्रेम भरलेले स्पर्श

सुखदायी त्या ऊबेने,     मन शहारून येते


स्नेह,प्रेम,आणि माया,यांची ऊब ही जपावी 

राग, द्वेष नि मत्सर,    आग भडकू न द्यावी


जळणाऱ्या शेकोटीची,  ऊब दुरूनच घ्यावी

धग दुःख चटक्यांची, नाहीतर लागेल सहावी


ऊब लाभता धान्याला,    होई त्याचे पूर्णब्रह्म

अन्न प्राशून मनुजा,        चित्ती येई समाधान


तीच ऊब ती वाहते,    रक्त होऊनी धमनीत

तापमान शरीराचे,       योग्य ठेवते राखून


त्या अर्थाची रे ऊब,      अर्थ देई आयुष्याला

वाममार्गाने संचय,         जन्म देई समस्येला


सूर्यप्रकाशाची ऊब,       ऊर्जा देई जगायाला

प्राणीजात जगी सारे       नमितात त्या तेजाला


जीव, जनन, वर्धन,         उब साऱ्याचे कारण

या ऊबेवर प्राण्याचे,       अवलंबून जीवन


ऊबेची होई जर,        अति उष्णता नि ज्वाला

तर पेटून उठेल,          ही धरित्री निर्मला


तृप्त ऐवजी ती तप्त,       जर पृथ्वी ही होईल

विनाशाच्या दिशेकडे,      मात्र पडेल पाऊल.


                               ✍️✍️ सौ. सविता हर्षे



Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर