चाळीशी

 


एखाद्याला अक्कल दाढ जशी केंव्हाही म्हणजे अगदी केंव्हाही येऊ शकते, तशीच एखाद्याला "चाळीशी" पण चाळीशी नंतर कधीही लागू शकते. मला अक्कल दाढा आल्या ऐन भरातल्या "गद्धे" पंचविशीत आणि त्या वाढत्या दाढांचा एवढा त्रास झाला की लगेचच त्या मुळापासून उपटून काढाव्या लागल्या. आमचा 'अकलेचा' संबंध बहुदा (!) तिथेच संपला. परंतु "चाळीशी" चे मात्र तसे नाही. कधी येणार हे जरी ती सांगून येत नसली तरी, एकदा ती वास्तव्याला आली की मरेपर्यंत साथ सोडत नाही. तुटते, फुटते, बदलते, पण "हम साथ साथ है" हे गाणे गुणगुणतच राहते.

ज्या मुलांना, तरुणांना, स्त्री-पुरुषांना चष्मा असतोच, म्हणजे डोळ्यातील काही दोषांमुळे किंवा दृष्टी कमकुवत असल्यामुळे; त्यांच्यासाठी तो चष्मा हा त्यांच्या "व्यक्तिमत्वाचा, शरीराचाच" एक भाग बनून जातो. पण या "चाळीशी" चे तसे नाही. एक तर ही चाळीशी म्हणजे "वाचनासाठी लागलेला चष्मा" आयुष्यात येतोच एकदम  दबक्या पावलांनी. म्हणजे वयाची चाळीशी लागली, की लगेच दुसऱ्या दिवशी या वाचनाच्या चष्म्याची ऑर्डर दिली जाते असे नाही. ती वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात वेग-वेगळी असते. म्हणजे माझ्या आयुष्यात ही  "चाळीशी" वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी अवतरली तर आमचे बाबा त्यांच्या साठी पर्यंत या चाळीशी शिवाय तरले. केवळ वाचनाच्या लिमिटेड फंक्शनॅलिटी च्या टॅग खाली गळ्यात पडलेल्या (म्हणजेच डोळ्यावर चढलेल्या) या दागिन्याचा "असून अडचण, नसून खोळंबा" अशी काहीतरी खिचडी होते, हे मात्र नक्की.

आपण आपली दिनचर्या नेहमी प्रमाणे राबवत असतो आणि एखाद दिवशी अचानक वृत्तपत्र वाचताना त्यातील अक्षरे पुसट झाल्यासारखी वाटायला लागतात. आपण फक्त डोळे चोळून, आपल्याही नकळत वृत्तपत्र थोडे लाम्बवर धरून मग उर्वरित वाचन पूर्ण करतो. रेस्टॉरंट मध्ये गेलेले असताना मेनू कार्ड नीट वाचता येत नाही आणि मग तिथल्या "अँबियन्स" च्या नावाखाली खपवलेल्या मंद प्रकाशाला किंवा कँडल लाईट ला नावं ठेवत आपल्या हातातील मोबाईल फोन चा प्रकाश त्यावर पाडत आपला कार्यभाग साधतो. दुकानात काही खरेदी केल्यास हातात पडलेली रिसिट तपासायला जातो तेंव्हा 30 च्या जागी 80 दिसून दुकानदाराशी जास्त पैसे लावले म्हणून उगाचच वाद घालतो आणि या वादाची परिणीती तो दुकानदार जेंव्हा स्वतःचा चष्मा सारखा करत तुम्हाला " मॅडम, ते 30 च आहे, 80 नाही. तुमचे डोळे तपासून घ्या एकदा" असे शिष्टाईने सांगण्यात होते, तेंव्हा कुठे या चाळीशी च्या आगमनाची जाणीव आपल्याला होते...पण अंधुकशीच.  बाबांचे साफ दृष्टीचे गुण अनुवांशिकतेते आपल्याकडे आलेच असणार याची खात्री, एवढ्यात कसा लागेल आपल्याला चष्मा असा स्वतःच स्वतःला केलेला अत्यंत वेडसर-निरागस प्रश्न यांच्या जोरावर पुढचे ५-६ महिने असेच कागद पुढे-मागे करत, डोळे चोळत जातात आणि मग तो दिवस उजाडतो जेंव्हा डोके प्रचंड दुखत असते, बाकी काहीही सुधरत नसते आणि घरातील
"सुज्ञ" लोकांकडून डॉक्टर ला डोळे दाखवून येण्याविषयी डोळे वटारले जातात. पुढचे सगळे तुमच्यातील अनुभवी जाणकारांना माहीतच असणार.  

मी प्राथमिक शाळेत असल्यापासून आमच्यात, म्हणजे "पिअर ग्रुप" मध्ये रूढ झालेला समज म्हणजे - वर्गातील ज्या मुला - मुलीच्या डोळ्याला चष्मा म्हणजे ते एकदम "स्कॉलर" ! मला माझ्या पंचेचाळीशी पर्यंत हा दागिना न मिळाल्याने वर्गात कायम पहिल्या पाचांत येऊन सुद्धा हुशारीच्या बाबतीत मन कायम साशंकच राहिले एवढे खरे ..असो. त्या काळात, म्हणजे मी लहानाची मोठी होण्याच्या काळात चित्रकलेच्या तासाला तुमच्या कुटुंबाचे चित्र काढा म्हंटले की कोणी ना कोणी विद्यार्थी आई-बाबा-बहीण-भाऊ यांच्याच बरोबर एक चष्मा घातलेले गृहस्थ काढत आणि सांगत की हे आमचे "आजोबा"! त्यामुळे चष्मा नसलेली व्यक्ती आजोबा असूच शकत नाही अशीही एक धारणा झाल्याचे पुसटसे आठवते. तो नियम आज्यांना बहुदा लागू होत नसावा कारण "आमची आज्जी अजूनही चष्म्याशिवाय एका सेकंदात सुईत दोरा ओवते" असे कुणीतरी सांगितलेले पण त्याच पुसटश्या आठवणीत "स्टोअर" झालेले आहे .... कॉलेज च्या दिवसांमध्ये चष्म्याच्या संदर्भात नोंद केलेली अजून एक गोष्ट म्हणजे नाटक सिनेमातील कलाकारांमधील वयाचा बदल दाखवण्यासाठी वापरली गेलेली प्रतीकात्मक प्रॉपर्टी ! म्हणजे इजाज़त मधील हनिमून ला 'कतरा  कतरा " गाणारी रेखा जेंव्हा नासिरुद्दीन शाह ला काही वर्षांनी एक पावसाळ्या रात्री रेल्वे प्लॅटफॉर्म च्या वेटिंग रुम मध्ये भेटते तेंव्हा - डोळ्याला चष्मा - तात्पर्य काय तर मध्ये काळ गेला आहे, वये वाढली आहेत. खरं तर आपल्या जन्मापासून आपल्या अवती-भोवती कायम दिसत असलेल्या अनेक गोष्टींपैकी "चष्मा" ही एक. त्या विषयी एवढे अप्रूप किंवा उत्सुकता वाटण्याचे तसे काहीच कारण नाही. पण हो, जेंव्हा हा सर्वसामान्य चष्मा आपल्या गोलाकार फ्रेमसह गांधीजींच्या प्रत्येक फोटोत डोळ्यांवर दिसतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातो तेंव्हा त्या चष्म्याचे "भाग्य" काही औरच असते, नाही का?

या फोटोवरून लिखाणाच्या निमित्ताने वेळ काढून विकी जरा धुंडाळला तेंव्हा या चष्म्याची कथा, शोध, वगैरे वाचनात आले. पूर्वी दृष्टी साफ व्हावी, लांबची गोष्ट जवळ दिसावी किंवा जवळची गोष्ट जास्त स्पष्ट, स्वच्छ दिसावी केवळ यासाठी वापरली जाणारी ही वस्तू आता आपल्या "फॅशन" कॉलम मध्ये वरचेवर प्रकट होत रहाते. ब्रॅण्डिंग च्या पुरस्कर्त्या या जागतिक बाजारपेठेत कोणी कोणत्या ब्रँड चे ग्लासेस किंवा शेड्स घातले आहेत हे तुमचे स्टेटस सांगते, परंतु तुमची दूरदृष्टी, ध्येय, दृष्टिकोन हे सर्व त्यातून प्रेरित होतेच असे नाही. असेही डोळ्यांवर चढवलेले हे डोळे परत परत पुसून साफ करता येतात, पण त्यातून बघणारी दृष्टी प्रत्येक वेळी साफ असेलच याचा काय भरवसा?

परवा माझ्या डोळ्यांच्या वार्षिक तपासणीच्या नंतर वाढलेल्या नंबरचा (हो, दोन वर्ष झाली ना बघता बघता) चष्मा बनवायला टाकताना त्या क्लीनिक-कम-शोरूम मधील नर्स-कम-सेल्सगर्ल नवी फ्रेम खरेदीच्या माझ्या उदासीनतेवर एवढी वैतागली की काहीशा नाराजीनेच तिने माझ्या जुन्याच फ्रेम मध्ये, इन्शुरन्स मध्ये बसेल अशाच नव्या नंबर च्या लेन्सेस ची ऑर्डर लिहून घेतली. ते करतानाच तिने अजून एक बॅक-अप चष्मा कसा आणि का असावा हे सांगत मासा गळाला लागतो का याचा मिणमिणता पण चिकाटीचा सेलॅस्गर्ल-पणायुक्त प्रयत्न केला. पण जेंव्हा पर्स मधून चष्मा गळ्यात अडकवण्याची साखळी काढून तिला मी दाखवली तेंव्हा तिच्या चष्म्यातून तिने माझ्याकडे काय दृष्टीने पहिले हे बघायला मी तिथे थांबलेच नाही !!

दोन वर्षांपूर्वी आयुष्यात अचानक येऊन माझाशी जन्माचं नातं जोडलेल्या त्या "चाळीशी" ला मी पण मग "तुझे जीवन की डोर से बांध लिया है.." असं अधून मधून ऐकवत राहते  !

~प्रीती
१/२९/२०२१






Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर