झुंज कविता

 

झुंज

 

 

येऊ देत संकटे कितीही, जखमी करू दे तनामना

छाती ठोकून झेल घाव अन झुंज देई तू पुन्हा पुन्हा IIधृII

 

मिणमिणत्या पणतीस पाहतो

वात भिरभिरा विझवाया

इवलाली ती ज्योत सावरे

थरथरती अपुली काया

तेवत राही दिवलीपरी तू, काळोखाच्या पुसुनी खुणा II१II

 

घास घ्यावया टपुनी बसला

अहि वेढूनी घरट्याला

भेदरलेली चिमणी पिल्ले

घट्ट बिलगती आईला

झडप घालुनी, चोच मारुनी पक्षीण तळपे लढताना II२II

 

भरकटलेली नाव एकटी

वादळ घोंघावे भवती

क्रंदन लाटांचे भयकारी

दर्याला येई भरती

नावाडी तो एकवटे बळ वल्हे हाती धरताना II३II

 

जरी घेरती चहूबाजूंनी

खिन्न सावल्या दु:खाच्या

दिशाहीन अन वाटे जीवन

प्रतीक्षेत जणू वाटेच्या

स्वत:च होऊनी तारा नभीचा, प्रकाश दे लुकलुकताना II ४II

 

 

~अनिता म. कांत

 

 

 

Comments

Popular posts from this blog

पूर्णविराम

भिंत

माझा बहुप्राणी प्राणी