नाट्य
चौकोना-चौकोनात वसलेली घरे..
आणि घरा-घरात असलेली माणसे,
माणासांच्या वेगवेगळ्या तऱ्हां..
..नशिबाचे उलट-सुलट फासे.
आजूबाजूला वाढलेली झाडे..
आणि झाडांच्या भोवताली रोपे,
रोपांच्या वेगवेगळ्या जाती...
..फांद्यांवर पक्ष्यांचे खोपे.
एक विस्तीर्ण पसरलेले आकाश..
आणि आकाशात ढगांचे ठिपके,
ठिपक्यांच्या वेगवेगळ्या नक्ष्या..
..उगीचच झेपावणारे झोके.
हा सगळा पसारा मांडून,
मग आवरत-सावरत बसलेला तो -
..आणि, एन्ट्री - एक्झीट च्या फेऱ्यात अडकलेले,
बाकी उरलेले सगळेच !!
~प्रीती देशपांडे
Comments
Post a Comment