पेय
'दारू' या विषयाला मुळीच न छेडण्याचा मी ठराव केला !
'पेय' म्हणताना आपल्याला, मादकच का आठवते?
पाणी, ज्यूस, चहा, कॉफी - आपसूकच मागे पडते?
ताक, लस्सी, शेक्स-वेक्स काय "प्यास" भागवत नाहीत?
की उसाच्या रसाचे जया-बच्चन 'अपिलिंग' वाटत नाहीत?
मादक-बिदक भंकस म्हणत, ठरावावर केला फोकस,
पेन कागद सरसावले, मदिरेला ठरवत जाम बोगस!
मेंदूच्या मंथन घाण्यात, काही विचार भरडले
आणि दोन-चार तास खपून खपून, काही-बाही खरडले..
मनासारखे तरी त्याला, वजन काही येईना
"क्या बात" कॉमेंट येण्याचा, फील काही देईना..
चहा-कॉफी च्या कटिंग सोबत, दिवसभर धरला बेस,
पण संध्याकाळ होता-होता, माझा वाढू लागला स्ट्रेस !
तेवढ्यात कुठून कधी नव्हे ते, नवऱ्यालाही आले प्रेम
अगं घे ब्रेक थोडासा म्हणत, ग्लास दोन भरले सेम !
लिखाण लिखाण कित्ती तुझे, थोडी निवांत हो,
फ्रायडे आहे आज यार, हमे कंपनी तो दो..
भजी तळूया थोडी डार्लिंग, 'सिंगल माल्ट' च्या जोडीला
काय रंगत येईल मग, संध्याकाळच्या गोडीला
झर-झर झरेल लेखणी तुझी, शब्दांना येईल अश्शी धार
गटकावून टाक भरलेला पेग, बाकी विचार बाजूला सार
नवऱ्याची बात प्रमाण मानत, मी पण झाले लुजन-अप
चिअर्स बिअर्स म्हणत करत, मारले एक-दोन गपागप
आता कालची संध्याकाळ ती होती, आणि आजची आहे दुपार ही
पुढे लिहावे म्हणतेय पण, सापडतच नाहीये कवितेची वही !!
Comments
Post a Comment