झुंज
हाय! माझं नाव ईरा. ही माझ्या आई-बाबांच्या लग्नाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल शीर्षक तर ‘झुंज’ आहे! त्याला २ कारणं आहेत. एक म्हणजे रोजच्या आयुष्यात आई बाबा कधीही एकमेकांशी सरळ बोलत नाहीत. टॅाम आणि जेरीसारखे सतत एकमेकांशी झुंज झुंज खेळत असतात. आणि दुसरं म्हणजे.. ते येईलच पुढे.
आई बाबा एका मित्राच्या घरी एकमेकांना भेटले. दोघेही सुंदर होते.. होते म्हणजे आहेत. मला अजूनही सुंदरच दिसतात. तर अगदी पहिल्या नजरेत नाही, तरी तिथेच कुठेतरी ते प्रेमात पडले. आई अजून कॅालेजमध्ये होती. एकदम चुटपुटीत, बडबडी आणि चाणाक्ष होती. मी तिला तसं कधीही पहिलं नाही. हां, चाणाक्ष आणि हजरजबाबी ती अजूनही आहे. बाबा अगदी हेड ओव्हर हील्स प्रेमात पडला तिच्या. तसा तोही हॅंडसम होता. नोकरी यथातथाच होती, पण होतकरू होता. आणि मुख्य म्हणजे नितळ, निर्मळ होता. त्यामुळे आईसुद्धा हेड ओव्हर हील्स. पण प्रॅाब्लेम असा झाला की आई एकदा खरंच हेड ओव्हर हील्स पडली.
त्याचं झालं असं की यथावकाश बाबाने आईला प्रपोज केलं, ती अर्थातच हो म्हणली. घरीही सगळे.. म्हणजे दोन्ही आजी-आजोबा खुश होते. लग्नाची तारीख ठरली. आणि लग्न ४ महिन्यावर आलं होतं तेव्हा आईचा खूप मोठा अपघात झाला. गाडीचा चक्काचूर झाला होता, आणि आईच्या बऱ्याच हाडांचाही. मेंदूलाही दुखापत झाली होती. ती वाचेल का नाही, सांगता येत नव्हतं. पण तिनं तब्बल १५ दिवस मृत्यूशी झुंज दिली. बाबा हा सगळा काळ हॉस्पिटल मध्ये तिच्यापाशी बसून होता. कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात तेव्हाही ते एकमेकांसोबत असतील. शेवटी आईला शुद्ध आली. तेव्हाच आई बाबांची झुंज या प्रकाराशी ओळख झाली. ही एक झुंज देऊन एखादा थकला असता, पण आई बाबांना उलट त्याची चटक लागली. त्यांना खाद्य पुरवायचं कामही नियती करत राहिली.
आई शुद्धीत आली होती, पण अंथरुणाला खिळून होती. बोलू शकत नव्हती, हालचाल करू शकत नव्हती. माझ्याएवढीच होती तेव्हा. २१ वर्षांची. मला कल्पनाही करवत नाही. बाबा तिचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलायचा सतत. ती फक्त त्याच्याकडे बघत राहू शकत होती. एवढी सुंदर, तरुण चुटपुटीत मुलगी. फक्त पापण्या हलवू शकत होती. बाबाला तेही चालणार होतं आणि.
तिला घरी आणल्यानंतर खरी झुंज सुरु झाली. जेवढं पूर्वीसारखं होता येईल त्यासाठीची झुंज. खूप पेशन्स आणि प्रयत्नानंतर ती आणखी थोडं हालू लागली. मोडकं तोडकं बोलू लागली. तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपलं म्हणणं पोचवता येऊ लागलं तेव्हा तिनं सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल? तिनं बाबाला लग्नाबद्दल पुन्हा एकदा विचार करायला सांगितलं. पुढचा प्रवास खडतर होता. आयुष्यभराचा प्रश्न होता. आई अगदी पूर्वीसारखी होण्याची शक्यता नगण्य होती. एखाद्या स्वप्नासारखं सगळं विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करण्याची संधी आईनं त्याला दिली.
मी बाबाच्या जागी असते तर मी या क्षणी काय केलं असतं हे प्रामाणिकपणे सांगणं अवघड आहे. कदाचित विचार करायला वेळ तरी घेतला असता. पण बाबाला एक क्षणही लागला नाही. त्याच्या डोक्यात भविष्यात आई किंवा काय असा प्रश्न नव्हताच. तो फक्त भविष्यात आईसाठी काय एवढाच विचार करत होता. प्रेमात असलं की कुठल्यातरी वेगळ्याच जगात असतो माणूस. प्रेमाची धुंदी असते. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेऊ शकतो. बाबाच्या बाबतीत २ शक्यता आहेत. एकतर तो भावनेच्या भरातला निर्णय नव्हता. किंवा बाबा अजूनही भावनेच्या त्याच भरात आहे.
हे बोलणं झाल्यावर आईनं आणखी एक बॉम्ब टाकला. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर राहायला तयार आहे, पण मी व्हील चेअरवर असेपर्यंत लग्न करणार नाही. जेव्हा मंडपात चालत येऊ शकेन तेव्हाच मी लग्न करेन. हे म्हणणं मात्र घरच्यांच्या विशेष पचनी पडलं नाही. यू नो, लोक काय म्हणतील वगैरे. लोक काय म्हणतील हे फाट्यावर मारायला लागून बाबाला बरेच महिने झाले होते, पण आजी आजोबा तयार नव्हते. म्हणून मग आई बाबांनी रजिस्टर लग्न केलं सगळ्यांच्या समाधानापुरतं आणि एकत्र राहू लागले. आप्तेष्टांच्या साक्षीने होणारं विधिवत लग्न हा आता नवा मैलाचा दगड झाला. तो टप्पा कधी येणार याची यत्किंचितही कल्पना दोघांना नव्हती. पण आता त्यासाठी नवी झुंज सुरु झाली.
आईची ट्रीटमेंट, स्पीच, आणि फिजिओ थेरपी सुरु होती. बाबाची नोकरी सुरु होती. जरा सगळं शांततेच्या वाटेनं चाललंय असं वाटेपर्यन्त माझी बातमी टपकली. डॉक्टरांसकट सगळ्यांचा विरोध असतानाही दोघांनी हे वळण स्वीकारायचं ठरवलं. त्यांच्या रजिस्टर लग्नानंतर २ वर्षांनी मी प्रकट झाले. माझं सगळं बाबा आणि दोन्ही आजी आजोबा करत होते. जमेल तसं आईही करत होती. सगळे म्हणतात की बाळ असताना मला आईकडून घेऊन जायचं म्हणजे एक झुंजच असायची. आईची जी काही शारीरिक प्रगती झाली होती, त्यासाठी बाळंतपण हा एक सेटबॅक होता. पण आई म्हणते आईपणाने मिळालेल्या समाधानासाठी या सगळ्यातून पुन्हा जायची तिची तयारी आहे. ती कुठल्या विचित्र मुशीतून घडलीये देवजाणे.
मी दोनेक वर्षांची झाल्यावर या सगळ्या साईड स्टोरीज पार करून आई बाबा पुन्हा मुख्य रस्त्यावर लागले. पुन्हा एकदा जोमाने थेरपीज, व्यायाम, प्रयत्न सुरु झाले. सगळं मला सांभाळत. आईची प्रगती संथ गतीने का असेना होत होती. व्हील चेअरवर ती घरकामाला थोडाफार हातभार लावत होती, पण बाबा प्रचंड कामाचा गाडा हाकत होता. आणि एवढं करून दोघेही समाधानी होते. दिवसातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत होते. मला घेऊन पहिल्या पावसात भिजत होते. छोटीशी फुलबाग वाढवत होते. व्हील चेअरवर आई, तिच्या मांडीवर मी आणि बाबा ती मागून हाकत पळतोय, असं आमचं विचित्र जगावेगळं कुटुंब रविवारी सकाळी कोवळ्या उन्हात जॉगिंग करायला जात होतो.
मी ७ वर्षांची असताना, म्हणजे आई बाबांच्या रजिस्टर लग्नानंतर तब्बल ९ वर्षांनी आई आमच्या घरात हॉल मधून स्वैपाकघरापर्यंत चालत गेली. मी तेव्हा शाळेत होते. पण जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी घरभर नाचले होते. आई बाबांच्या लग्नाची तयारी सुरु झाली. आजी आजोबांना एवढं खुश मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि माझे तर उगाचच वेड्यासारखे लाड सुरु होते.
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. आम्ही सगळे स्वतःला जेवढं सजवता येईल तेवढं सजवत होतो. पण माझी आई इतकी सुंदर दिसत होती की मी तिचं वर्णन नाही करू शकत. माझ्याकडे तेवढे शब्दच नाहीत. मुहूर्ताची वेळ झाली आणि माझी आई खुरडत खुरडत मंडपात येऊ लागली. आणि त्या पुढचं आम्हाला कुणालाच काही आठवत नाही. दिसतही नव्हतं काही. सगळ्यांचे डोळे धूसर झाले होते. मला सगळे सांगतात की मी आजीला बिलगून आई बाबांकडे बघत नॉनस्टॉप हमसून हमसून रडत होते. काहीतरी वेगळंच अनुभवलं आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी. एका नात्याची सुरुवात.. एका खूप मोठ्या झुंजीचा शेवट.
तळटीप: प्रेरणा 🙏: https://www.youtube.com/watch?v=wX1we9BdkaI
'TRUTH IS STRANGER THAN FICTION!'
Comments
Post a Comment