रस्ते, घरे, वगैरे..
रस्ते असतात - आपल्याच जागी,
मुकाट, बांधून ठेवलेले.
जशी असतात घरे -
आपल्याच जागी निपचित पडलेली.
आणि रस्ता व घर यांच्यामधील,
आपण सगळे;
तळ्यात-मळ्यात करणारे
कधी रस्त्यांना वेग ,
तर कधी घरांना स्थैर्य देणारे…
रस्ते चुकतात कधी कधी -
आणि घरेही उध्वस्त होतात.
आपण जिवंत पुतळे…
फरफटतो या दोन निर्जीवांत
कधी रस्त्याकडे तर कधी घराकडे
आशेने बघत…
काही बदलले किंवा नाही बदलले
तरीही, प्रवास चालूच राहतो
रस्त्यावरून घराकडे
अथवा घराकडून रस्त्याकडे
कधी जोडत तर कधी तोडत
अखंडपणे …
~प्रीती देशपांडे
Comments
Post a Comment