उब

 "उब" हा शब्द मला नेहमीच आज्जी च्या गोधडीची आठवण करून देतो, आणि या आठवणींसोबतच तिची दुपारच्या वेळी गोधडी शिवत बसलेली मूर्ती सुद्धा डोळ्यासमोर येते. खरं तर आज्जीचा मोजकाच सहवास मला मिळाला. वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत २०-२२ दिवस तिच्या सहवासात घालवायला मिळायचे तेवढेच. पण तिच्या ४ नातवंडातली मी एकुलती एक "नात" असल्याने तिच्या हृदयाचा एक हळवा कोपरा माझ्या मालकीचा असल्यासारखे मला जाणवायचे. आमची आज्जी नऊवारी नेसणारी. तिच्या सुती साड्या सुद्धा तिच्या त्वचेसारख्या मऊ, मुलायम असायच्या. या निगुतीने वापरलेल्या साड्या जुन्या झाल्या की ती त्याच्या गोधड्या शिवायची आणि आम्हा नातवंडांची ती गोधडी पांघरण्यासाठी 'वार' लागायचे. ज्या दिवशी ती गोधडी पांघरून झोपण्याचा योग येई, त्या दिवशी झकास उबदार झोप लागायची. 


वयाच्या २९ व्या वर्षी आज्जी विधवा झाली. ९-१० वर्षांच्या संसाराच्या काही आठवणी आणि जन्माला घातलेली ३ मुले यांना घेऊन तिचा पुढचा सगळा घडलेला प्रवास. आज्जी दिसायला गोरीपान, देखणी, ताठ, शिडशिडीत..पण तिच्या चेहऱ्यावरचे आतोनात कष्टांचे आणि कणखर कर्तृत्वाचे तेजच जास्त लोभसवाणे वाटायचे. घरचे सगळे सांभाळून, पुण्याच्या नूमवि प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करून, तिन्ही मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊन- मोठे करून तिने आपली सगळी कर्तव्ये चोख बजावली. त्या काळातील इतर आज्ज्यांप्रमाणे "आमच्या काळात हे नव्हतं" किंवा "आम्ही काय भोगलंय आम्हाला माहीत" अशा प्रकारची वाक्य कधीही आज्जीच्या तोंडून निघाल्याचे माझ्या आठवणीत नाही, किंवा नियतीने तिला जो कष्टमय प्रवास दिला त्याबद्दल कधी तक्रारही नाही. मला तर तिचं आयुष्य ही एक तपश्चर्याच वाटत आलीये. 


गम्मत म्हणजे माझी ही नऊवारीतली आज्जी तशी एकदम "मॉड" होती. म्हणजे, माझ्या आयुष्यातली पहिली जीन्स ची पॅन्ट मला आजीने घेतली होती. मी अमेरिकेत यायला निघाले तर तिने माझ्या हातात "सोन्याचे" घड्याळ ठेवले. म्हणाली, आता कधी भेटणार तू, म्हणून आज्जीची आठवण.. काहीतरी दागिना हवा ना! पण तिकडे ऑफिस ला मंगळसूत्र कशी घालणार तू? म्हणून हे घड्याळ.. घालशील ना रोज? त्यावेळी मी अमेरिकेत यायला निघाले होते, पण मला आज्जीच्या, काळाच्या खूप खूप मागे असल्यासारखे वाटले होते.. 

प्रत्येकाच्याच आयुष्यात एक कठीण काळ येतो आणि तास तो माझ्याही आयुष्यात आला. वयाच्या ३२ व्या वर्षी मी फाईल केलेले घटस्फोटाचे कागद त्या नावातील "स्फोटा" प्रमाणे एक प्रचंड वादळ घेऊन आले. आमच्या पूर्ण कुटुंबातील, मित्र परिवारातील पहिला घटस्फोट. भारतात दोन्ही कुटुंबात वाटाघाटीच्या चर्चा सुरु झाल्या. जेंव्हा ती चर्चा आज्जीकडे गेली तेंव्हा तिने सगळ्यांना ठणकावून सांगितले - " हा माझ्या नातीचा निर्णय आहे आणि तिने तो पूर्ण विचार करून घेतलेला असणार याची मला खात्री आहे. माझा तिला आणि तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे आणि तिचे पुढचे आयुष्य सुखाने जावे असे वाटत असेल तर बंद करा या चर्चा.." मला जेंव्हा हे समजले तेंव्हा १० हत्तीचे बळ मिळाल्यासारखे वाटले. तिची गोधडी जवळ नसतानाही तिच्या शब्दांमधली विश्वासाची उब मिळाली. आज्जी खरंच काळाच्या फार फार पुढे होती. 


नंतर १०-११ वर्षांत जेंव्हा जेंव्हा प्रत्यक्ष भेट किंवा फोन वर बोलणे झाले तेंव्हा मला म्हणायची, प्रीती एकटी नको राहूस.. एकट्याने प्रवास फार कठीण असतो पोरी. मी हसून तिचे बोलणे उडवत तिला विचारायचे - तू नाही का वयाच्या २९व्या वर्षा पासून एकटी राहिलीस - ते सुद्धा त्या काळात, तर मी पण राहीन. म्हणायची, आम्ही एकत्र कुटुंबात होतो, बाकी आधार होते. काळ वेगळा होता. आताची परिस्थिती बदलली आहे. आणि तिने तिच्या या म्हणण्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला. ती हे जग सोडून जाण्याच्या ६ दिवस आधी तिला तिच्या होणाऱ्या नव्या जावयाची भेट घडवून दिली. बसवत नव्हते, तरी मनाचा हिय्या करून उठून आवरून बसली होती. कित्ती आनंदी आणि समाधानी दिसली ती त्या दिवशी. जणू काही हाच दिवस बघण्यासाठी थांबून राहिली होती.. 


आज्जी गेलीच. पण मामाच्या घरी अजूनही तिने शिवलेल्या १-२ गोधड्या आहेत आणि आज्जीचा पणतू तिची ती 'उब' अनुभवतोय. माहीत नाही त्या १-२ गोधड्या अजून किती पिढ्यांना ही उब अनुभवायला देईल, पण माझ्यासाठी मात्र "उब" हा शब्द आज्जीची आणि तिच्या गोधडीची आठवण, त्यातील माया आजही ताजी करतो आणि करत राहील...


~~प्रीती देशपांडे

Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू