घर

 

घर

 

दु:खाचा आणि माझा घरोबा

तसा जुनाच आहे!

 

ते माझ्या घरी कधीही उगवतं... धुमकेतुसारखं

वेळ-अवेळ,

दिवस-रात्र,

उन-पाउस,

कशाचाही मुलाहिजा न ठेवता.

पण आगंतुकासारखं नाही...

खूप दिवस परदेशी राहून घरी परत आलेल्या आपल्या माणसासारखं!

 

पण आल्यावर साधं ओळखीचं हसू नाही...चौकशी नाही..

”कशी आहेस? मागच्या वेळेपेक्षा रोड दिसते आहेस...” काही नाही

कर्तव्य केल्याप्रमाणे घरात घुसायचं...

एकटी होतीस न म्हणून आलोय, असा काही भाव.....

साथीचं आश्वासन नाही की सोडून जाण्याची धमकी नाही

 

मग काय!

घरभर मांडून ठेवलेला पसारा

लिहून फाडून टाकलेले कागद...

कोणी लेखक बिखक आहे की काय कोण जाणे!

घरातले सामान वापरते की सरावाने... पण कधी केलेल्या एखाद्या पदार्थाचे कौतुक नाही..

असंही नवीन नाहीच ती भावना..

कधी आपणहून बोलायला जावं तर

हुं नाही की चुं नाही

मात्र न बोलताही घरात उमटते त्याची गुंज ...सर्वत्र!

 

नाही म्हणायला 

झोपायच्या खोलीतील खिडकीतून दिसणार्या चंद्राशी डोळे भिडवताना

पाहिलंय मी...

नीळं-सावळं आकाश आणि दु:ख यात नातं आहे काही तरी

चंद्राच्या उजेडात एक होऊन जातात दोघं

आणि उशीपाशी साचतो चांदण्यांचा सडा

 

हळूहळू नवलाई सरली की सवय होते मनाला

सहवासातून प्रेम जडत म्हणतात तसं

 

मग एके दिवशी सामान-सुमान भरून निघतं की जायला!

कुठे जाणार

पत्ता नाही..

कधी येणार

माहित नाही..

हे शेवटचे भेटणे आहे का?

“तुला काय वाटते”

(हेसुद्धा डोळ्यानीच विचारायचं)

 

ते गेल्यावर मी सुन्नपणे बघत राहते

आपल्याच घराकडे

अनोळख्या नजरेने...

 

कोणाचं घर आहे हे? त्याचं की माझं

कोणाचा अधिकार आहे या छतावर? दारावर? किंवा हवेवरही?

छाप तर त्याचीच आहे सर्वत्र...जणू भिंतीवर टांगलेल्या फोटोतून कर्त्या माणसाची असावी तशी ..

अदृश्य वावर आहेच त्याचा...

आभास आहे पण स्पर्श नाही...

आवाज आहे पण शब्द नाहीत...

गुणगुण आहे पण गाणे नाही...

 

 

ते गेल्यावर मेजावर दिसणारं एक पत्र...

आत असतात.. काही गुलाबाच्या पाकळ्या.. ओलसर,

एक पुसटसा सुगंध आणि

एक कविता ... ती मात्र माझ्या हक्काची आहे!

 

 

दु:खाचा आणि माझा घरोबा

तसा जुनाच आहे!

 

~अनिता म. कांत

 

Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर