अर्धमेले आ s s ले

 ~~~ अर्धमेले आ s s ले ! ~~~


भरत जाधव च्या “सही रे सही” नाटकामध्ये, त्याने रंगवलेले पात्रं म्हणजे मिस्टर गलगले. हे गलगले स्वतःच्याच  हालचालींची स्वतःच commentry करतात. गलगले आ s s ले ! असं शेवटचा शब्दं लांबवून एका विशिष्ट टोन मध्ये. गलगले उ s s ठले, गलगले चा s s लले, गलगले ब s s सले, गलगलेंना राग आ s s  ला वैगेरे वैगेरे. खूप धमाल होती.  अश्याच गलगलेंवर वर आधारित आणि त्यांच्या नावाशी rhyming असं माझं पात्रं आहे आज. ह्यांचं नाव आहे “अर्धमेले”. हे अर्धमेले मात्रं मिस्टर किंवा मिसेस कोणीही असू शकतं. हे पात्रं विनोदी नाही. हे स्वतः स्वतःची कॉमेंटरी पण करत नाहीत, दुसरे करतात,म्हणून मी आज त्यांची करणार आहे. तुमच्या आजूबाजूला हे मिस्टर किंवा मिसेस अर्धमेले कुठेना कुठेतरी दिसतात. मग तुम्ही म्हणता “अर्धमेले आ s s ले !”


हे अर्धमेले, मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या नावाखाली जिवंतपणीच अर्धमेले झालेले आहेत. त्यांना भरभरून जगण्यापेक्षा मरणाचीच जास्तं ओढ ! हे अर्धमेले आजूबाजूच्या वातावरणात आणि माणसांमध्ये एक प्रकारची मळभ पसरवतात. यांना कोणतीही passion नाही. ते कायम उदासीन. हे अर्धमेले  “work hard, play hard” या आधुनिक फिलॉसॉफीच्या च्या ऐवजी “play nothing, work nothing” च्या मागे. म्हणून काहीही करायचं असलं की यांना “कशाला ? काम नाही का दुसरं तुला ?” असं म्हणतात. यांना त्यांच्या स्वप्नात, कधीतरी कोणीतरी बाबाने काहीतरी आशीर्वाद देऊन, आयुष्याचं काहीतरी गूढ सांगितलेलं आहे. हे बाबा किंवा महाराज खरे असोत किंवा नसोत.  अर्धमेले यांनी अध्यात्माचा चुकीचा अर्थ लावून जिवंतपणीच जगणं सोडून दिलेलं आहे. अर्धमेल्यांचा गाढ विश्वास आहे  की, ते enlightened  झाले आहेत ! बाकीच्या लोकांना त्यांच्या या समाधीची अवस्था कळूच शकत नाही अशी त्यांची समजूत आहे. दुसऱ्यांची त्यांना समजण्याची  पात्रताच नाही. आयुष्य हे हसण्याकरता आणि धमाल करण्याकरता आहे, ह्या तत्वानी जगण्याऱ्या लोकांकडे मग हे अर्धमेले तुच्छतेने बघतात. त्यांना अशी लोकं, भौतिक सुखाच्या मागे लागणारे, आयुष्याचा खरा अर्थ न समजणारे वैगेरे क्षुद्र वाटतात. मग जातायेता, ते किंवा त्या प्रत्येक बाबतीत असमाधान व्यक्तं करतात. अर्धमेल्यांनी दुर्लक्षं के s s लं,  अर्धमेल्यांनी तोंड वाकडं के s s लं ! अर्धमेले कुत्सितपणे हस s s  ले ! 


मी. अर्धमेले कायम वेगवेगळ्या बाबांच्या किंवा महाराजांच्या शोधात असतात. कारण कोणीच त्यांचे फुकट प्रॉब्लेम्स सोडवून देत नाहीत.  यांना खरं म्हणजे सगळंच पाहिजे असतं, फक्तं फुकट मिळणं महत्वाचं. अर्धमेल्यांच्या स्वप्नात शिवाजी महाराज येत नाहीत, प्रकाश आमटे,  नेल्सन मंडेला असे माणसांमधले देव येत नाहीत. एखाद्या कलेचा किंवा खेळाचा सुंदर अविष्कार बघून हे वेडेही होत नाहीत. अध्यात्मा मधल्या “सुख दुःखापासून अलिप्त रहा” या तत्वाला ते त्यांना सोयीस्कर असा अर्थ देऊन मोकळे होतात.  कारण या अर्धमेल्यांचा मूळ स्वभाव म्हणजे हाडामासात भरलेला आळस, परिणामी दुसऱ्याशी जुळवून न घेण्याची तयारी. त्यामुळे यांना जगातून निघूनच आपले प्रॉब्लेम्स सुटतील असा गाढ विश्वास आहे. “नशीबात नाही” असं म्हणून ह्यांनी कायम हात टेकलेले आहेत. यांचं मजा करण्याच्या पूर्व तयारीचं पारडं, ती मजा घेण्यापेक्षा जास्तं भरतं. त्यामुळे ते “कशाला उगीचच” असं म्हणतात. तू जिवंत ठेवल्यामुळे मला श्वासोश्वास करावा लागतो अशी देवाकडेच ते तक्रार करतात. मग देव प्रश्नं सोडवत नाही म्हणून, हे कासावीस होतात.  देवासमोर गाऱ्हाणी घा s s  तली , देवासमोर अर्धमेले र s s डले ! अर्धमेल्यांनी हट्ट के s s ला ! 


बा भ बोरकरांनी म्हणलंय , 


स्वर्ग नको सुरलोक नको, 

मज लोभस असा इहलोक हवा

तृप्ती नको मज मुक्ती नको 

मज येथील हर्शनी शोक हवा ! 


अर्धमेल्यांना हा इहलोक कधी सुंदर वाटतच नाही. ज्या देवानेच हे सुंदर शरीर दिलं ते शरीरचं त्यांना नको आहे. मानव जातीच्या दुर्दव्याने बदनाम झालेल्या स्पष्टवक्त्या ओशो ने एका ठिकाणी म्हणलंय,  ज्या नाकाने सुगंध अनुभवला, ज्या डोळ्यांनी हा सुंदर समुद्र दाखवला, ज्या कानाने मंत्रमुग्ध करणारं संगीत ऐकवलं, ज्या त्वचेवर पाण्याचे तुषार अनुभवले, ते शरीरच यांना फेकून द्यायचं असतं. पुढे जाऊन ओशो म्हणतो, सगळ्या अध्यात्मिक गुरूंनी सांगितलं कि “आत्ताच्या क्षणात जगा, भूतकाळ किंवा भविष्य काळात नको, पण हे अर्धमेले तर कमाल करतात, या जन्माचं भविष्यच काय, तर ते जन्मानंतरच्या भविष्यात  जगतात. कमाल झाली ! ह्याच अर्धमेल्यांकडे काल्पनिक स्वर्गात कधीही म्हाताऱ्या न होणाऱ्या सुंदर अप्सरांच पेटंट आहे.


शरीराच्या तुरुंगात त्यांचा आत्मा अडकलेला आहे, त्या गजा पलीकडून रडवेल्या आत्म्याने हे जगाकडे बघत असतात. देवाने ह्यांना शरीराच्या रूपाने एक “सेल्फ ड्रायविंग कार” दिलेली आहे.  अगणित सेन्सर्स लावलेली कार. ती कार देऊन देव म्हणतो, “जा बघ किती सुंदर जग मी निर्माण केलंय ! “ पण यांना त्या कार च्या maintenance चा कंटाळा. यांना शरीर हि मागच्या जन्मीची शिक्षा वाटते. यांचे हे सेन्सर्स कायम बंद ! यांच्या भावना बधिर झालेल्या. यांना चांगलं काही दिसत नाही, ऐकू येत नाही, अर्धमेल्यांनी डोळे बंद के s s  ले ! कान बंद के s s ले ! 


मिस्टर किंवा मिसेस अर्धमेल्यांना सगळ्यात जास्तं त्रास कोणाचा होत असेल तर, घरच्यांचा ! कारण घरचे कायमचेच आजूबाजूला ! त्रास द्यायला ! मुलांचा धांगडधिंगा चालू असतो, नवऱ्याचा TV तर कधी मित्रांच्या गप्पा चालू असतात किंवा बायकोचं गाणं ऐकणं चालू असतं , पण यांचं मात्रं स्वतःशी  आतून युद्ध चालू असतं. त्यात घरातल्या लोकांकरता काहीतरी काम करावं लागतं, मग अर्धमेले खवळतात, तो राहिलेला अर्धा जीव सुद्धा रागाने फणफणतो ! अर्धमेले सकाळी उठल्या वर सुद्धा, ऑफिसला जावं लागणार किंवा स्वयंपाक करावा लागणार या कल्पेनेने रोज चिडतात. दिवसातले साधे साधे challenges सुद्धा त्यांना रॉकेट science सारखे अवघड वाटायला लागतात . त्यांना खरं म्हणजे काहीच नको असते. कोणत्याही गोष्टीला मुद्दाम दुर्लक्ष किंवा चिडचिड याच्या शिवाय दुसरी प्रतिक्रिया नसते. अध्यात्मात ऐकल्या मुळे “प्रेम हा स्थायी भाव असतो” असं तोंडाने म्हणत राहातात, पण तिथे सुध्दा प्रयत्न करावे लागतात हे विसरतात आणि कोणीच साथ देत नाही म्हणून चिडतात. ते धड सुखाने झोपत नाहीत, नाही आनंदाने दिवस घालवत. असल्या दिवस रात्रींनमधे, त्यांचं सरतेशेवटी, न जगता आयुष्यं संपतं.


अर्धमेले झो s s पले , अर्धमेले उ s s ठले , अर्धमेले चि s s डले, अर्धमेले कायमचे झो s s पले, अर्धमेले मे s s  ले , अर्धमेल्यांना परत जन्मं मिळाला, अर्धमेले मे s s ले ! 


सुdhir


Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू