किंवा
किंवा
~ अनिता म. कांत
कधी अनोख्या वळणावरती घेऊन जाई प्रवास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास
दूरवरी मिळतात कुठेसे
स्वप्न आणखी जाग
धूसरशा त्या क्षितिजावरती
कुणी छेडते राग
कणखरसा मुलतानी किंवा हळवा भीमपलास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
जमल्या गोपी, रमली राधा
ढळता कातरवेळ
यमुनाकाठी कान्हा रचतो
जगावेगळा खेळ
अध्यात्माची सीमा किंवा शृंगाराचा रास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
कधी मनाचे उडे पाखरू
स्वच्छंदी गगनात
भरून घेई चंद्र चांदण्या
अपुल्या दो पंखात
हाय! अपुर्या इच्छा किंवा खुळा आत्मविश्वास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
कधी दु:खाची धूर्त चेटकी
अशी करी जादू
जर्जर वाटे जीवन सारे
पिचके, तकलादू
चूक आपली असते किंवा दुर्दैवाचा फास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
कधी बरसते सुख होऊनी
सोनेरी किरणे
ओठांवरती सहज उमटते
सुरेलसे गाणे
ऐहिक का हे सारे किंवा आत्म्याचा उल्हास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
डोळ्यांमधुनी तुझ्या वाहते
शतकांची आशा
मौनामधुनी तुझ्या ऐकू ये
प्रीतीची भाषा
असेल मृगजळ का हे किंवा खरोखरीची आस
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
पाण्यामध्ये प्रतिमा बघते
उभी तळ्यापाशी
हात लावता तरंग उठती
होई दिसेनाशी
खरे कोण हे? ती किंवा मी कसे कळे कोणास?
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
प्रत्यक्षाहून कल्पनेमध्ये
अंतर नाही फार
खेळ मनाचा सगळा, त्याचा
कुणा न लागे पार
काय खरे हे? वाटे किंवा सत्याचा आभास
उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II
Comments
Post a Comment