उत्तर: लावणी

 

उत्तर: लावणी

~अनिता म. कांत




ज्वानीचा ज्वर अंगी वाढे, उरी काहीसे सलते हो
सवाल माझा प्रेमाचा अन उत्तर तुमचे भलते हो  II



किंवा, अथवा, किंतु, परंतु
भाषा तुमची नाही बरी
उद्या पहिला कुणी राजसा?
घडी आजची आहे खरी
घड्याळ्यातल्या काट्यांसंगे कालचक्र हे पळते हो  ll


उघडून डोळे पहा एकदा
फुलला वसंत चोहीकडे
झुरे एकटी कळी बिचारी
दडला भुंगा कुणीकडे
कसा सहावा विरह साजणा? काळीज माझे जळते हो  ll


आडदांड हो तुम्ही सावळे
मी चाफ्याची कळी जशी
उत्तर दक्षिण संगम होता
दिशा मिळे या जीवनासी
शेजेवरची लबाड जाई प्रश्न विचारून छळते हो  ll


रंग गुलाबी ओठांवरती
काय सांगतो पुन्हा पुन्हा
भिरभिर फिरुनी तुमच्याभवती
नजर लाजरी करी खुणा
हलकीशी बट वार्यावरती तुम्हा विनवण्या वळते हो  ll



Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू