मातीची महती

 

मातीची महती

~अनिता म. कांत

 

मातीची महती सांगू मी काय

चराचराची जणू ती माय

 

मातीच्या कुशीत बीज सानुले

आईच्या मायेने किती जपले

 

तरारून ये कोंब कोवळा

जीवनाचा सुरु होय सोहळा

 

तरू वाढती गगनापार

मातीत मुळे, देती आधार

 

फुलांचे निर्माल्य आणि पाचोळा

परते मातीत होऊनी गोळा

 

जीवन घडे, जीवन ढळे

चक्र चालते मातीच्यामुळे

 

साहुनी प्रखर वावेच्या झळा

घागर होउनी साठवी जळा


मातीची चूल तापे खापर

पानात येई उन भाकर

 

दगड माती होई एकत्र

रहाया घर डोई दे छत्र

 

मूर्ती देवाची, भक्त हो मग्न

वासना चाळवी प्रतिमा नग्न

 

दोन्ही घडती एकाच हाती

भाव भिन्न जरी एकच माती

 

पहिली सर मृद्गंध असा

आईचा पदर हुंगावा जसा

 

किती सोसते पाणउतारे

तुडविते पायी जग हे सारे

 

म्हणती कोणी हा “मातीमोल”

“मातीत मिळसी” लावती बोल

 

पोटात घेई प्रमाद सारा

अन्न, वस्त्र आणि देई निवारा

 

थकल्या देहा इथे विश्रांती

मिळून जायचे मातीत अंती

 

मृण्मयी रूपे चिन्मयी होती

निर्गुण साकारे सगुणा ओठी

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू