मगरमाकड
~~~ मगरमाकड~~~
मागच्या महिन्यात आमच्या “मोनोलॉग” ग्रुप वर लिहायला विषय दिला “चंचल किंवा चंचलता”. ग्रुप वर संवेदनशील कवियत्री आहेत, पण असे नाजूक विषय दिले की माझी गडबड होते. त्यामुळे, मला पहिल्यांदा आठवला आमच्या वर्गातला सिंधी “चंचलानी”. त्याचा चंचल स्वभावाशी खरं म्हणजे काही संबंध नाही. उलट चंचल मुलींना शांतपणे गालातल्या गालात हसत सहज पटवेल अशी personality. पण आठवला. हेच काय तो उंच स्वरात मातादीची भजनं गाणारा “चंचल” पण आठवला. त्याचा छान चंचल स्वर एके दिवशी छताला अडकून बसला, तोच तो. चंचल विषयावरून चंचलानी आणि गाणारा चंचल आठवणं म्हणजे माझ्याच चंचल आणि अस्वस्थ स्वभावाचं लक्षण म्हणावं लागेल.असो.
पण खरेखुरे चंचलानी काही कमी नसतात. फुग्यात हवा भरायची आणि (फुग्याचे) तोंड न बांधता फुगा सोडून द्यायचा, मग तो कसाही कुठेही, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात फूस फूस करत सुसाट सुटतो, तसे हे चंचल लोकं. एकदा विचारांच्या या कप्प्यात तर एकदा दुसऱ्या. कधी कधी तर ते कोपरे इतके मिक्स होतात की, डोकं एका कोपऱ्यात आणि जीभ दुसऱ्या. म्हणायचं एक असतं, बोलतात दुसरंच. अशी लोकं, ड्रायविंग करताना चौकात कुठं वळायचं याच्या गोंधळामुळे, गोल चक्कर मारून परत आले त्या रस्त्याने निघून जातात. अगदी भीष्म प्रतिज्ञा घेऊन ठरवलेली गोष्टं सुद्धा त्याच संध्याकाळी मोडतील. त्यात त्या प्रतिज्ञेत दुसऱ्यांचे हात पाय पण अडकवले असतील तर, दुसऱ्यांना पण सगळीकडे फिरणाऱ्या रोलरकोस्टर चा अनुभव मिळतो.
असच काही सुचत नाही चंचलते वर तर, गूगल मारलं. तर चक्कं “चंचलते पर उपाय” असे बरेच विडिओ दिसले. पण त्याच बरोबर “सुंदर आणि चंचल” मुलींचे फोटो पण आले. Google स्वतःच इतकं चंचल आहे की, ते दुसऱ्यांना पण चंचल करतं. टाईप करायला लागलं की लगेच तिथल्या तिथे सूचना देऊन माणसाला भलत्याच दिशेला घेऊन जातं. उजवीकडे कसं वळायचं हे बघायला गेलो पण डावीकडे वळून मजा बघून परत तिथेच आलो अस बऱ्याच वेळा होतं. या गुगळे, फसबूक आणि व्हात्साप्प (google च्या मते असेच उच्चार) यांनी सगळ्या जगाला चंचल केलेलं आहे.
माझी रास आहे मकर. वर्तमानपत्रात भविष्य ज्याने बघतात ती चंद्रराशी. आणि लग्नंरास मीन. लग्न रासेचा लग्नाशी काही संबंध नाही. एका चंचल गोंधळलेल्या ज्योतिष्याने चुकून “लग्नं” असं नाव दिलेलं असणार. लग्नं रास मूळ राशीयेव्हढीच महत्वाची. मकर राशीचं चिन्हं म्हणजे मगर. ही अवजड मगर हलता हालत नाही. मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात असंच काही हालचाल होत नाही असं उपाध्येंच्या राशिचक्रात म्हणलेलं आठवतंय. Zoo मध्ये सुद्धा लोकं मगरीकडे बघतात आणि २ मिनिटात कंटाळा येऊन पुढे जातात. ही तशीच तिथेच ढिम्म. परत तासांनी आलं तरी तशीच, फक्तं तोंड आता उघडं असेल. आणि लग्नराशी मीन, हिचं सिम्बॉल म्हणजे विरुद्ध दिशेला पोहणारे दोन मासे. त्यामुळे या राशीचे लोकं कायम गोंधळलेले असतात असं म्हणतात. म्हणजे हे करू का ते ? अशा मनस्थितीतले चंचल. थोडक्यात काय तर दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे माझी मनोवस्था “चंचल मगरी” सारखी असते. म्हणजे डोक्यामध्ये विरुद्ध दिशांच्या माश्यांसारखे विचार बदलत असतात. मीन राशीची खूण “माकड” असायला पण हरकत नव्हती. एका फांदी वरून दुसऱ्या फांदीवर मनाच्या उड्या. तर असं मनात माकड, पण शरीर मात्र मगरी सारखे हलता हालत नाही, अशी माझी परिस्थिती होते. मग शेवटी ती मगर, न हलता आपल्याच विचारांच्या आंदोलनाने दमून पडलेली असते. डोळे फिरवत, हतबल होऊन मनातल्या माकडांकडे बघत. या जगात माझ्या मुळे “मगरमाकड” नावाची नवीन जात तयार झाली आहे. ती सुद्धा नामशेष व्हायची पाळी आली आहे. कारण मीच एकटा शिल्लक आहे.
तुम्ही म्हणाल चंचलते वर नुसते टीका चाललीय ह्याची. तर चांगली बाजू आहेच ना. चंचलता, नैसर्गिकता आणि सौन्दर्य नाही का आणत ! ती calculated नसते. एखाद्या प्राण्याच्या, शेळीच्या, हरिणाच्या पिल्लाकडे बघायला किती छान वाटतं ! टणाटण उद्या मारत ते कुठंही जात असतं. त्यात एक निष्पापपणा असतो. तशीच एखाद्या सुंदर स्त्रीची चंचलता सौन्दर्य जास्तं खुलवते. एखादी कविता पटकन होऊन जाईल अशा सौन्दर्यावर. आणि आहेत पण. “जीवनसे भरी तेरी आँखे” या किशोर कुमार च्या गाण्यात नाही का “किरणोन्का तेज है चेहरे पे, हिरनोंकी है तुझमें है चंचलता” ? किती मोहक शब्दं आहेत. (तरी या टणाटण उडणाऱ्या हरिणाबरोबर लग्नानंतर एका पांघरुणात झोपणं कसं शक्य आहे असा या मगरमाकडी विचार आलाच).
तर त्या हरिणाच्या पिल्ला पेक्षा आपल्या सगळ्यांची आतून मनस्थिती काही वेगळी नसते, वेगळी नसावी. मनाची सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर अस्थिरता. “Change is the only constant” असं नाही का म्हणत ? अनुभव बदलतात, मन बदलतं आणि माणसं बदलतात. जी बदलत नाहीत ती भूतकाळात अडकून बसतात. आपण बरेचसे स्थिर असतो ते समाजाकरिता, आजूबाजूच्या आपल्या लोकांकरता, थोडंसं दाखवायला. संधी मिळाली तर रोज लोकं नवनवीन गोष्टी करतील. निसर्गाचा लहरीपणा प्रत्येकात असतो. आपण तो दाबून ठेवतो. आणि वरून दिसणारी स्थिरता आणतो.
अरे वा ! म्हणजे “मगरमाकड” ही जात काही फार वाईट नाही, चंचलता आणि स्थिरता यांचं अनोखं combination असंच म्हणावं लागेल ! याच नावाची नवीन तेरावी रास काढायला पण हरकत नाही. उगीचच शेवटी जाता जाता स्वतःचा गौरव करणे, असे या राशीचा special गुणधर्म धरायला हरकत नाही.
सुdhir
Comments
Post a Comment