मधु
मधु
~अनिता म.कांत
मधुशाळेतील प्याल्यांमधुनी मधु छलकते लाल
इथेच अमुचा स्वर्ग आणखी इथेच ताजमहाल IIधृII
कुणी हासती आम्हा कुत्सित
समजुनी मातीमोल
कुणी करतसे थट्टा
आणि कुणी लावती बोल
मधुवाचुनी जीवन खोटे कुणी त्यांस सांगाल II१II
मधु-मधुरा संगे भरतो
स्वप्नांचा दरबार
मधुशाळेच्या भिंतीन्मागे
दडला साक्षात्कार
लंघून जाता उम्बर्यास त्या भेटे नरक जहाल II२II
पेय नसे हे अमृत समजा
अजब रसायन हे
एका घोटामध्ये सुखाचे
येते भान नवे
दु:ख-वेदनांसवे जगाया करिते शक्ती बहाल II३II
एका प्याल्यामध्ये विसरती
धर्म, जात अन नाव
क्षणात होती समसमान ते
रंक आणखी राव
उत्तर सगळ्या एक “वारुणी”, भिन्न असोत सवाल! II४II
Comments
Post a Comment