“हो किंवा नाही?” चे उत्तर

 “हो किंवा नाही?” चे उत्तर 


प्रत्येक “हो किंवा नाही?” चे उत्तर बऱ्याच वेळा “हो आणि नाही” असंच असतं असं अनुभवाने लक्षात आलंय. गोधळलांत ? मुळात एखाद्या प्रश्नाचं उत्तर, हो आणि नाही असं दोन्ही असू शकतं, हे मला अमेरिकेत आल्यावर कळलं. अमेरिकेतल्या पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्ये एकाला “Yes or no ? ” असा प्रश्नं विचारला तर त्याने उत्तर दिलं “well, yes AND no!”. मी पहिल्यांदाच असं मूर्खांसारखं उत्तर ऐकत होतो. मनातल्या मनात हसलो. शाळेतल्या एका मारकुट्या मास्तरांची आठवण झाली, “सांग, हो का नाही?” असं दरडावून विचारल्यावर एका शब्दात उत्तर आलं नाही, म्हणून त्या विद्यार्थ्याने मार खाल्ला होता. या मास्तरांचा मार खात असताना, मास्तर अदृश्य केले तर मुलगा सध्याचा आयटम डान्स करतोय असं वाटेल असे सटासट मारायचे. असो. 


प्रत्येक हो हा नाही च्या आधाराने, प्रत्येक नाही हा हो च्या आधाराने उभा असतो. जशी दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्रं आहे म्हणून दिवस आहे. “हो आणि नाही” हे उत्तर आता जास्तं नैसर्गिक वाटायला लागलंय. निसर्ग unpredictable आहे, तसं ह्या प्रश्नाचं उत्तर. आजचा दिवस छान उबदार आहे म्हणता म्हणता वातावरण बदलतं, बाहेरचं, घरातलं किंवा मनातलं. 


वय वाढलं की बऱ्याचशा माणसांचा बऱ्याचशा मतांबद्दल दुराग्रही पणा कमी व्हायला लागतो. कारण अनुभव वाढलेला असतो. जी मतं आयुष्यभर घट्ट धरून ठेवली, त्याच्या बरोब्बर विरुद्ध मतं असलेली माणसं काही मूर्ख निघाली नाहीत, काहीतर आपल्याही पुढं गेली. ही ठेच कुठेतरी लागलेली असते. आणि त्या मताचा कंगोरा कुठेतरी बोथट झालेला असतो. त्यामुळे “आता बरेच शांत झाले किंवा झाल्या आहेत” असं कोणाबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकतो. थोडक्यात काय तर ते “हो किंवा नाही” वरून “हो आणि नाही” वर आले, दुसरी बाजू थोडी समजायला लागली. 


या “हो किंवा नाही” च्या आग्रहाने आपल्या आयुष्यात मोठे प्रॉब्लेम्स केले आहेत. असं व्हायलाच पाहिजे. मी म्हणतो तेच बरोबर, आम्ही म्हणतो तेच बरोबर. “नाही म्हणजे नाही !”.  दुसरी बाजू असूच शकत नाही. एक वडील म्हणून, किंवा आई म्हणून माझंच मत बरोबर असं मुलांवर लादलं जातं, तेंव्हा generation gap ची सुरुवात होते. संवाद संपतो आणि अंतर वाढतं. “माझं कोणी ऐकत नाही” “मला कोणी समजून घेत नाही” अशी वाक्यं जन्माला येतात. दुसऱ्याला जगू देण्याचं स्वातंत्र्य अडगळीच्या खोलीत गुदमरून मरतं. 


मी कॅलिफोर्निया मध्ये राहतो. हे स्टेट म्हणजे प्रेसिडेंट ट्रम्प च्या प्रचंड विरोधात, सगळीच पूर्व आणि पश्चिम किनारा ट्रम्प च्या विरोधात. ट्रम्पला अमेरिकेने निवडून दिले, या डिप्रेशन मधे असताना, त्याच वेळी अमेरीकेचे सगळ्यात मोठे मराठी संमेलन BMM करता मध्य-अमेरिकेत गेलो. “पांढरे” पणाचा माज असलेल्या इथल्या ब्लू कॉलर माणसांनी याला निवडून दिलं हा विचार करत असतानाच, मराठी आवाज आला “कसली वाट लावली त्याने बघितली ना ? काय जबरदस्त एन्ट्री घेतली चायला !” लहानपणी मी अमिताभ बच्चन बद्दल असं बोलायचो. मला कळेना, आपलेच जोशी कुलकर्णी लिफ्ट मध्ये माझ्याच शेजारी उभे राहून त्याच तात्यांचं कौतुक करत होते. नंतर गप्पा मारायला सहज “बसलो” होतो, तात्यांच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला म्हणून हीच आपली माणसं, बच्चन स्टाईल बिअर बाटली डोक्यात घालतात का काय असा भास झाला. हेच मी इथे कॅलिफोर्निया मध्ये ट्रम्प बाजूने विचार मांडण्याचा प्रयत्नं केला, कोरोना वायरस च्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा virtual बिअर बाटली माझ्या डोक्यात घातली. आपल्याला कोणी गुंड सतावत असेल, तर आपण कोपऱ्यावरच्या दुसऱ्या गुंडाशी दोस्ती करतो, याच्या मदतीने त्याचा काटा काढण्याकरता. मध्य-अमेरिकेने याच भावनेने ट्रम्प ला निवडून दिले हे आता लक्षात आल्यावर माझं डिप्रेशन गेलं. म्हणजे इथे सुद्धा उत्तर मधेच आहे. परंतु, दोन्ही बाजू “हो किंवा नाही” च्या तुरुंगात अडकलेल्या. सत्य आणि संवाद या दोघांना इथे रोज फासावर लटकवण्यात येतं. 


“हो आणि नाही” चं दुसरं नाव म्हणजे negotiation ! वाटाघाटी. या वाटाघाटी कधी सुरु होतात तर हजारो लोकं मेल्या नंतर, डोक्यात प्रकाश पडतो, अरे, दुसऱ्याचं पण काहीतरी बरोबर असेल बरं का ! अजून राहिलेली माणसं मरण्यापेक्षा जरा दुसरी बाजू ऐकून घेऊ. तो दगडा वर कोरून ठेवलेला “हो किंवा नाही” जरा पुसट करू. 


स्त्री आणि पुरुषांच्या जगात तर हो आणि नाही हे दोघंही स्वतःच गोंधळले आहेत, की त्यांची भूमिका काय आहे. “नाही म्हणजे हो” (किंवा हो म्हणजे नाही ) या तालावर जगातल्या ८० टक्के स्त्रिया त्यांच्या पुरुषांशी संवाद साधतात. म्हणूनच  “दिल में हां और होठो पे ना “ अशा गाण्यांवर आम्ही नाचतो. “नको आहे मला मदत! ” असं जेंव्हा बायको ठासून सांगते, तेंव्हा तिला मदत पाहिजे असते, हे समजणाऱ्या नवऱ्याच्या बरगड्या जरी दिसत असतील तरी तो नवरा तिला निधड्या छातीचा शूरवीर वाटतो. या वाक्याचा शेवट “वाटतो” हा शब्दं जास्तं महत्वाचा आहे. कारण त्यात फीलिंग्स आहेत. जिथे फीलिंग्स आहेत तिथे “हो किंवा नाही” च महत्वंच संपतं, वस्तुस्तिथी कितीही हो कडे झुकली असेल तरी, स्त्री ला वाटत असेल नाही, तर नवराच काय, ब्रह्मदेव सुद्धा “दिल में हा” गाण्यावर तांडव नृत्यं करतो. जी गर्लफ्रेंड बरीच वर्ष बॉयफ्रेंडला लग्नाचा आग्रह करत असते, त्याच गर्लफ्रेंडला हा बॉयफ्रेंड गुडघ्यावर उभा राहून, हातात फुलं घेऊन, surprise देण्याचा आव आणत “विल यू मॅरी मी” असं विचारतो, आणि ती पण तिथेच लग्नाला “हो”कार देते जसं काही ती नाही पण म्हणू शकली असती ! कधी कधी आजू बाजूचे लोकं सुद्धा “Say Yes!” असं म्हणून तिला होकाराचा आग्रह करतात. प्रणयाची सुरुवात स्त्री च्या “नाही” ने असते, त्या नाहीचा अर्थ नाही असेल तर ती बळजबरी ठरते, त्याचा अर्थ मोहक लाजरा “हो” असेल तर प्रणय सुंदर होतो, आणि जर स्त्री बलात्कारी असेल, तर हाच “नाही” खोट्या आरोपासाठी पोलिसात जातो. आणि नंतर हो आणि नाही ची उध्वस्त कुटूंबे कोर्टाबाहेर धाय मोकलून रडतात. 


“आईन रँड” ही जुनी फिलॉसॉफर राहिलेल्या २० टक्के स्त्रियांमधली. जिने “स्वतःचा स्वार्थ बघा” असा गूढ संदेश दिला तीच ती. तिने उलट सांगितलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्तं हो किंवा नाही यातलच असू शकतं. अर्थात थोडा संदर्भ वेगळा आहे . त्याला इंग्लिश मध्ये “you can not eat your cake and have it too” असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी कधीच मिळत नाहीत. एकाचा त्याग करावाच लागतो. तत्वज्ञानावरच बोलतो आहोत, तर दोन महान विचारवंतांचं स्मरण झालं. जे कृष्णमूर्तींचं “choiceless awareness” आणि ओशोचं “सहज योग”. दोन्ही मध्ये एकच संदेश. Choiceless म्हणजे कधीच चॉईस करू नका, जे काही येतंय ते आनंदाने स्वीकारा, फक्तं जाणीव ठेवा. थोडक्यात कशालाही “हो किंवा नाही” नाही, हेच पाहिजे असं नाही, हे नकोच हे पण नाही. ज्या क्षणी तुम्ही तो चॉईस कराल, तिथे संघर्ष चालू, स्वतःशी, दुसर्याशी आणि आयुष्याशी. 


काही माणसं फक्तं दिसू आणि ऐकू येणाऱ्या गोष्टींवरच विश्वास ठेवतात. काही गोष्टी मनुष्यजातीला समजण्यापलीकडे असू शकतात याच गोष्टींवर त्यांचा विश्वास नसतो, याचं आश्चर्य वाटतं. अर्थात मला इथे अंधश्रधेला प्रोत्साहन चुकूनही द्यायचे नाही. परंतु इथे सुद्धा दुसरी बाजू असूच शकत नाही, मानव सर्वशक्तिशाली आणि त्याला सगळं माहिती आहे, जे माहिती नाही ते अस्तित्वातच नाही, म्हणजे हीच लोकं काही शतकांपूर्वी पृथ्वी सपाट मैदान आहे आणि पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतात या गैरसमजूतीत इतकी अडकली होती की पंधराशेच्या शतकामध्ये गार्डिनो ब्रुनोला यांनी जिवंत जाळलं. कारण काय तर त्यानी शोध लावला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वीभोवती सूर्य नाही. पण आम्हाला नाहीना तसं दिसत डोळ्याने ? मग मारून टाका !  


परंतु, “हो आणि नाही” असं उत्तर जो माणूस देतो, त्याला एक तर कमकुवत समजतात किंवा स्वार्थी, ज्याला सगळंच पाहिजे असा असमाधानी. आणि “हो आणि नाही” चा दृष्टिकोन कधी कधी माणसाला कोणत्याच निर्णया पर्यंत पोचवू शकत नाही हे मान्यं. परंतु निर्णय असू दे नाहीतर मत, ठाम करताना इतकं पण दुराग्रही असू नये की दुसऱ्या बाजूशी वैर निर्माण होईल. 


थोडक्यात काय,  तर “हो आणि नाही” या दोघांच्या खांद्यावर हात ठेऊन जो सेल्फी काढतो, तो जास्तं समतोल आणि हसरा दिसतो, कारण त्याला दोन्ही कडून आधार, संघर्ष कमी आणि सहजता जास्तं. 


सुdhir

(हेमांगी वाडेकर यांनी सुचवलेल्या “किंवा” किंवा “उत्तर” या दोन विषयांकरता लेखन )


Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू