कवितेचा भडीमार

 कवितेचा भडीमार

~अनिता म. कांत


स्वत:वर टीका करता आली पाहिजे....

 

पाडू पाडू पाडू, आम्ही कविता पाडू

अशी लेखणी हातामध्ये, जसा शोभतो झाडू

आम्ही कविता पाडू llधृll

 

यमकाचे नच आम्हां सोयर

मात्रांचे का सूतक असावे?

ढक्कलगाडी मध्ये शब्द नि

अर्थाना कोंबून बसवावे

अकलेचे तोडू तारे, बुद्धीचे कागद फाडू

    पण आम्ही कविता पाडू II१II

 

कविता पडता अमुची ठंडी

घालू तिला भक्तीची बंडी

रडू बेगडे गत काळावर

फिरवू स्त्रीमुक्तीची झंडी

साध्याभोळ्या रसिक जनांची नाडी झटकनी ताडू

अन, आम्ही कविता पाडू II२II

 

माथी मारू आप्तजनांच्या

वाजवूनही घेऊ टाळी

तवा तापला WhatsAppचा

शेकून घेऊ अपुली पोळी

करी वाहवा मेहुणी, जरी डोके धरती साडू

पण आम्ही कविता पाडू II३II

 

फिरवून भाषेवर वरवंटा

आम्ही वाजवू अमुची घंटा

काढे पाजून रोज सकाळी

बळकट करितो अपुला खुंटा

उठता चापटपोळी आणिक बसता धम्मक लाडू

पण आम्ही कविता पाडू  II४II

 

यमकासाठी आपुली दिंडी

थेट पोहोचते रावळपिंडी

शब्दांचे शिरकाण करीतसे

स्वत: कविता बनून चंडी

दर्जा आणि विचार यांना धरणीमध्ये गाडू

पण आम्ही कविता पाडू II५II

 

Comments

Popular posts from this blog

पूर्णविराम

भिंत

माझा बहुप्राणी प्राणी