बटाटे पुराण

बटाटे पुराण आमच्या घरामागे एक छोटा बगीचा आहे. एक छोटासा गझीबो, त्यात बसायला खुर्ची आणि सोफा. आम्हाला दोघांना बागेची हौस आणि सोस. हौसेने लावलेली फुलझाडे, द्राक्षाचे वेल, थोडी फळझाडे (हा सोसाचा भाग). फुले, फळे अगदी सुंदर येतात. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी. पण भाज्यांची कथा जरा निराळी आहे. गेली अनेक वर्षे, हवेतला गारवा कमी झाला आणि जमीन थोडी उबदार झाली कि नर्सरीची फेरी करून तरतऱ्हेच्या भाज्यांची रोपे आणणे हा आमचा आवडता उद्योग. टोमॅटो, मिरच्या - तिखट आणि ढोबळी, काकडी, झुकिनी अशी अनेक रोपे आणून जमिनीमध्ये थोडी नवी माती, थोडे घरी केलेले कंपोस्ट, असे मिसळून जमीन तयार करावी. दरवर्षी ऊन कुठल्या भागात, कसे येते आहे याचा रिसर्च करावा. कारण मधल्या काळात कडेची झाडे उंच झालेली असतात. सावली पाडणाऱ्या झाडांची कापणी करावी. पाण्याची ठिबक सिंचन व्यवस्था नीट चालते आहे ना याची खात्री करावी आणि मोठ्या प्रेमाने भाज्यांच्या बिया आणि रोपांची लागवण करावी. या व्रतात खंड पडत नाही. पण एव्हढे सगळे करून हाती काय लागेल याची खात्री नाही. म्हणून या वर्षी ठरवले की भाज्यांच्या नादी लागायचे नाही. ...