वाट
वाट जी अंतरातूनी निघते, अन वळते माझ्यापाशी ती वाट जाऊनी मिळते, थेट तुझ्या हृदयाशी II धृ II ही वाट जुन्या वळणांची तर कधी नव्या स्वप्नांची कधी पखरण गंध-फुलांची, कधी कंटक तळपायाशी II १ II घर तुझे जरी शेणाचे अन माझेही मेणाचे मी ठिकाण आषाढाचे, तू उन्हात मज सावरशी II २ II ती धुक्यात हरवून बसते ग्रीष्मात करपुनी रुसते चकव्यात फिरोनी गोल पोहोचतेच मुक्कामाशी II ३ II वाटेवर कितीक झाडे जणू अबोल हे वाटाडे दावती मार्ग खात्रीचा दु:खाच्या फाट्यापाशी II ४ II चाललो जरी भरपूर न जायचे कुठे दूर इथेच रामेश्वर अन इथेच अपुली काशी II ५ II