डिजिटल बैराग्याचे महानिर्वाण

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहॉं मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया “नंबर त्वेल, मिडीयम फ्राईज, डाएट कोक?” जॅक इन द बॉक्स च्या जुनाट, तपकिरी, पंजाभर रुंदीच्या खिडकीतून आलेल्या दक्षिण अमेरिकन गोडव्याने साहिरचे शब्द फुटेनासे झाले. कुठली असेल ही? मेक्सिको? निकाराग्वा? पेरू? विचार करताकरताच बैराग्याने त्याचं अमेरिकन एक्स्प्रेस त्या गोडव्याकडे देऊन टाकलं आणि हातात कोंबलेली ब्राऊन बॅग पॅसेंजर सीटवर फेकून तो ड्राईव्ह-थ्रू मधून चालता झाला. “सर, युअर कार्ड” वगैरे खिडकीतले शब्द ऐकून न ऐकल्यासारखे करून. दक्षिण अमेरिकेतून आलेल्या, तपकिरी कातडीच्या, चुणचुणीत नि ‘हॉट’ ललना बैराग्याला स्वतःच्याच जातकुळीतील, कधीकधी रक्ताच्या नात्यातील वाटत. अमेरिकन स्वप्नाच्या ओढीने इकडे येणाऱ्या लमाणांच्या तांड्यातील सगळे शेवटी सारखेच. कुणी भिंतीवरून उड्या टाकून येतात, कुणी भुयारातून, तर आपल्यासारखे कुणी सरळमार्गी, विमानाचं तिकीट काढून नि कागदपत्रं घेऊन. इतकाच काय तो फरक. शेवटी अमेरिकेतलं कुठलं तरी छोटंमोठं शहर सगळ्यांना गिळून टाकतं. रात्रीचे १:२७ वाजले होते. साहिर, देव आनंद, रफीशी जोडलेली माझी नाळ बैरागी ...